Join us

अवकाशकन्या अवरतली पृथ्वीवर, सुनीता विल्यम्स प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:36 IST

Deputy CM Eknath Shinde: सुनीता विल्यम्स यांनी दाखवलेला प्रचंड संयम, अतुलनीय धाडस, आणि कधीच हार न मानण्याची ध्येयासक्ती हे सारे निव्वळ प्रेरणादायी आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Deputy CM Eknath Shinde: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिने १३ दिवस अडकून पडलेले 'नासा'चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील समुद्रात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलचे लैंडिंग झाले. सुनीता विल्यम्स सुखरुप परतल्याबाबत जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारतातूनही अनेक जण यावर व्यक्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सुनीता विल्यम्स परतल्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. 

आकाशकन्या अवरतली पृथ्वीवर. आकाशाकडे पाहून स्वप्न पाहणारे आपण सारे आणि आकाशाला गवसणी घालून एक स्वप्न सत्यात उतरवून पृथ्वीवर परतलेली सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचे मनापासून स्वागत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे. कारण अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळवारीसाठी गेलेल्या सुनीता तब्बल नऊ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा

सुनीता आणि बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचा कॅप्सूल भारतीय वेळेनुसार आज पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वीरीत्या उतरले. सुनीता पुन्हा कधी पृथ्वीवर परततील की नाही असे वाटत असतानाच अखेर ही अशक्यप्राय कामगिरी नासातील शास्त्रज्ञ आणि स्पेस एक्सच्या सदस्यांनी शक्य करून दाखवली आहे. सुनीता यांनी करून दाखवलेली संशोधनची ही कामगिरी आकाशवीर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक सुनीतांसाठी नक्कीच  प्रेरणादायी ठरतील याची मला पूर्ण खात्री आहे. सुनीता विल्यम्स यांनी दाखवलेला प्रचंड संयम, अतुलनीय धाडस, आणि कधीच हार न मानण्याची ध्येयासक्ती हे सारे निव्वळ प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा..!, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. क्रू9, पुन्हा स्वागत आहे! पृथ्वीला तुमची आठवण येते. सुनीता विल्यम्सचा अंतराळ स्थानकावरील अनुभव संयम, धैर्य आणि अमर्याद मानवी भावनांची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि क्रू 9 मोहिमेतील अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय आहे. ही घटना लाखो लोकांना कायमची प्रेरणा देईल, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :सुनीता विल्यम्सएकनाथ शिंदे