मुंबई - कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील भाजपा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून होत आहे. तसेच, लक्ष्मण सावदी यांचं वक्तव्य बालिशपणाचं आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर बोलताना उपमुख्यंत्री लक्ष्मण सावदी यांची जीभ घसरली, सावदी यांनी चक्क मुंबईही कर्नाटकचीच असल्याचं वक्तव्य केलं. त्यावरुन, महाराष्ट्रातील नेत्यांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अभिवाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार, असं सवदी म्हणाले होते. सवदी यांच्या विधानाचा संजय राऊत यांनी आज समाचार घेतला. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार, असल्याचे ठणकावून सांगितलंय. आता, मंत्री उदय सामंत यांनीही यासंदर्भात भाजपा नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीय.
''कर्नाटकच्या मा उपमुख्यमंत्री यांचं वक्तव्य बालिशपणाच आहे.. कर्नाटक मधील मराठी बांधवाना वेठीस धरण्यापेक्षा त्यांना न्याय द्या..आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी सिमभागाबाबत तसेच कर्नाटक उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्याबाबत ची भूमिका स्पष्ट करावी.'', असे ट्विट उदय सामंत यांनी केलीय.
अजित पवारांनी ठणकावलं
"मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार", असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं असावं, कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले. "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला", असं अजित पवार म्हणाले.
संजय राऊतांनी लगावला टोला
कर्नाटक सीमावादावरुन बेळगाव सोडा मुंबई देखील कर्नाटकचा भाग आहे, असं विधान करणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी झापलं आहे. "असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा", असा टोला संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही निर्णायक बैठक होती. त्यामुळे कोणी काही बरळलं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, बेळगाव महाराष्ट्रात आलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावं", असा इशारा संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिला