लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत शनिवारी लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल मुंबई पालिका प्रशासनाने घेतली आहे. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्र कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त (परिमंडळ दोन) हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. पुढील १५ दिवसांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
भाटिया रुग्णालयासमोरील कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सहा रहिवासी मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्याअंतर्गत इमारतीचे मालक व पदाधिकाऱ्यांना अग्निरोधक यंत्र कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या इमारतीमध्ये बसवण्यात आलेली अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरली. यामुळे आगीचा धोका वाढला.
प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी उपायुक्त (परिमंडळ दोन) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी डी. के. घोष, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) आणि उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव, शहर) यांचा समावेश असेल.
या प्रमुख बाबींची चौकशी होणार
- प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगीचे नेमके कारण शोधणे. आगीच्या प्रसारचे कारण शोधणे.
- पालिकेने मंजूर केलेल्या आराखडाव्यतिरिक्त इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम अथवा अनधिकृत बांधकाम केले आहे का?
आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांशी बोलून या दुःखद प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यांनी हाॅस्पिटलमध्ये जाऊन रूग्णांवरील उपचारांची माहिती घेतली.