Join us  

उपमहाराष्ट्र केसरी विक्रांत जाधवचे वर्चस्व

By admin | Published: March 17, 2016 2:19 AM

यंदाच्या वर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या विक्रांत जाधव याने आपल्या लौकिकानुसार दमदार प्रदर्शन करताना पंजाब केसरी अशोक कुमार याला अवघ्या एका मिनिटात निकाल

मुंबई : यंदाच्या वर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या विक्रांत जाधव याने आपल्या लौकिकानुसार दमदार प्रदर्शन करताना पंजाब केसरी अशोक कुमार याला अवघ्या एका मिनिटात निकाल डावावर चीतपट करून निकाली कुस्ती स्पर्धेतील एक नंबरची कुस्ती जिंकली. मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे मंगळवारी कुस्त्यांचे जंगी मैदान भरले होते. या वेळी रंगलेल्या पाच मानाच्या कुस्त्यांमध्ये उपमहाराष्ट्र केसरी विक्रांतने सर्वांचे लक्ष वेधताना आपला दबदबा राखला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत विक्रांतने सुरुवातीपासूनच आपला हिसका दाखवताना अशोक कुमारला आपला खेळ करण्याची संधीच दिली नाही. विक्रांतच्या ताकदवान पकडीपुढे अशोकचा अखेरपर्यंत काहीच निभाव लागला नाही. या शानदार विजयासह विक्रांतने दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि चांदीची गदा पटकावली. दोन नंबरच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी अहसाब अहमद याने आपला दम दाखवताना कृष्णा शेळके याला पाच मिनिटांत लोळवले. गदालोटची अप्रतिम पकड करताना अहसाबने कृष्णावर मात करून एक लाख रुपयांच्या रोख बक्षिसावर कब्जा केला. तर अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या तीन नंबरच्या कुस्तीमध्ये शिवाजी पाटील (कोल्हापूर) आणि रवी गायकवाड (पुणे) यांच्यातील रोमांचक लढत तब्बल ४० मिनिटांनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. अन्य एका लढतीत लपेट डावाचा वापर करून संदीप काशिद याने चार नंबरच्या कुस्तीमध्ये बाजी मारताना आनंदा कोकाटेला नमवले. तर पाच नंबरच्या अखेरच्या मानाच्या कुस्तीमध्ये विश्वास कारंडेने बाजी मारत तानाजी वीरकरला चीतपट केले. (क्रीडा प्रतिनिधी)