तीन अपत्ये असल्याचे लपविणारी महिला कारागृह उपअधीक्षक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:33+5:302021-04-30T04:08:33+5:30
गृह विभागाचे आदेश; नियुक्तीवेळीच शासनाची फसवणूक जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शासकीय सेवेत नियुक्तीवेळी खोटी माहिती ...
गृह विभागाचे आदेश; नियुक्तीवेळीच शासनाची फसवणूक
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय सेवेत नियुक्तीवेळी खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या एका महिला कारागृह उपअधीक्षकाला खात्यातून बडतर्फ करण्यात आले. स्वाती खुशालराव जोगदंड असे त्यांचे नाव असून भरतीपूर्वीच त्यांना तीन अपत्ये होती. मात्र आपल्याला दोन मुली असल्याची माहिती त्यांनी सादर केल्याचे विभागीय चौकशीतून स्पष्ट झाल्याने त्यांना खात्यातून काढून टाकण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.
जोगदंड या राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नऊ वर्षांपूर्वी तुरुंग विभागात जिल्हा कारागृह वर्ग- २ कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. चौकशीच्या कालावधीतही त्यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाला अधीन राहून हा निर्णय घेण्यात आला.
* कारागृह वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकाराची माहिती अशी :
- राज्य लोकसेवा आयोगाने मध्यवर्ती कारागृहात जिल्हा कारागृह -वर्ग दोन स्तरावरील उपअधीक्षक पदासाठी सरळसेवा भरतीसाठी १५ एप्रिल २००९ ला जाहिरात दिली होती. त्यामध्ये निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयोगाने शासनाकडे केलेल्या पात्र उमेदवारातून जोगदंड यांच्यासह एकूण आठजणांची नियुक्ती गृह विभागाने केली होती. त्यानंतर १५ मार्च २०१२ रोजी त्या खात्यात रुजू झाल्या होत्या. त्यानंतर ११ जानेवारी २०१६ मध्ये त्यांना एकूण तीन अपत्ये असताना त्यांनी खोटी माहिती देऊन भरती झाल्याची तक्रार कारागृहाकडे करण्यात आली. त्याबाबत पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षकांच्या चौकशीत ही बाब कागदोपत्री पुराव्यातून स्पष्ट झाली.
- त्यांनी शासन अधिसूचना २८ मार्च २००५ रोजी तरतुदींचा भंग केल्याने त्यांची पुणे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात आली. त्यामध्ये स्वाती जोगदंड यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म २९-४-२००७ रोजी झाला असताना २३-१२-२०१५ रोजी दिलेल्या जबाबात आपल्याला दोनच मुली असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
* असा आहे नियम
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ नुसार २८ मार्च २००५ नंतर जन्मलेल्या मुलासह दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना सरकारी सेवेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार स्वाती जोगदंड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ मधील कलम ५ (९)नुसार कारागृह उपअधीक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आले.
-------------------------------------