ऐरोली-काटई नाका प्रकल्पाची रखडपट्टी; दोन टप्प्यांतील कामाच्या पूर्ततेला पुढच्या वर्षाचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 07:50 AM2023-10-16T07:50:24+5:302023-10-16T07:50:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमएमआरडीएने हाती घेतलेला ऐरोली - काटई नाका प्रकल्प तीन टप्प्यात हे काम पूर्ण केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीएने हाती घेतलेला ऐरोली - काटई नाका प्रकल्प तीन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. मुळात या प्रकल्पाला नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ३८५ कोटी खर्च करण्यात येणार होते तसेच हा प्रकल्प डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होता. मात्र प्रकल्पाचा खर्च वाढत गेल्याने प्रकल्पाची रखडपट्टी झाल्याचे पहायला मिळत आहे. या दोन टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी ९१८ कोटी खर्च केला आहे. या उन्नत मार्गामुळे नवी मुंबई- डोंबिवली दरम्यानचा प्रवास १५ ते २० मिनिटांत करणे यामुळे शक्य होणार आहे.
तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच
तिसऱ्या टप्प्यातील कल्याण - शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नत मार्ग असणार आहे. त्याकरिता सल्लागारातर्फे प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्यात येत आहे. त्या या भागाकरिता निविदा मागविण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पारसिक डोंगरामध्ये १.६८ कि. मी. लांबीचा दुहेरी बोगदा असून, बोगद्याचे सुमारे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मे, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे.
दुसऱ्या टप्प्यात मुलुंड - ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्त्यापर्यंत उन्नत मार्ग बांधण्यात येणार असून, या भागाचे सुमारे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम ऑक्टोबर, २०२४ पर्यंत एमएमआरडीए पूर्ण करणार आहे. या दोन टप्प्यांसाठी एमएमआरडीएने ९१८ कोटी खर्च केले आहेत.