Join us

दिवा स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरला, ‘पिक अव्हर’मधील लोकल फे-यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 4:48 PM

मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरला आहे.

मुंबई: एरव्ही सामान्य मुंबईकरांना नित्याच्या झालेल्या लेटमार्क प्रवासाचा प्रत्यय देशभरातील अनुयायींनी देखील घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या (अप) जलद मार्गावर दिवा स्थानक आणि पारसिक बोगदा या दरम्यान मालगाडीची बोगी घसरली. बुधवारी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ही घटना घडली. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी बोगी पुन्हा रुळावर आणण्यात आली. रात्री ७ वाजून ३३ मिनिटांनी लोकल अप जलद दिशेला पहिली लोकल धावली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तथापि महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेल्या अनुयायांसह दैनंदिन प्रवाशांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले होते. परिणामी लोकल फे-या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर येथे एकत्र आले. संभाव्य गर्दी लक्षात घेता सोमवार रात्रीपासून अनुयायींनी मुंबईकडे धाव घेतली होती. यामुळे दादर आणि अन्य स्थानकात गर्दी होती. दुपारी पावणे चार वाजेच्या ठाणे-नवी मुंबई ट्रान्स-हार्बर मार्गाजवळ मालगाडी घसरली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या जलद मार्गावरील मालगाडी इंजिनपासून ११ वी बोगी रेल्वे रुळावरुन घसरली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दुर्घटनेमुळे अप जलद मार्गावरील लोकल फे-या अप धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. दिवा ते ठाणे या मार्गावर हे बदल करण्यात आले आहेत. डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. घसरलेली बोगी परत रुळावर आणण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.दुर्घटनाग्रस्त मालगाडीच्या तीन बोगी मध्य मार्गावर होत्या. यामुळे जलद मार्गावरील लोकल एकामागोमाग उभ्या होत्या. यात मेल-एक्सप्रेसचा देखील समावेश होता. अप मार्गावरील लोकल वेळेत न पोहचल्यामुळे डाऊन मार्गाच्या लोकलवर त्याचा परिणाम दिसून आला. या संबंधी माहिती स्थानकावरील उद्घोषणा यंत्रणेतून प्रवाशांना देण्यात आली. सायंकाळच्या सत्रातील लोकल तब्बल ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती दिवा स्थानकातील प्रवाशांनी दिली.दुर्घटनेमुळे पिक अव्हरमधील लोकल फे-या देखील उशिराने धावत होत्या. दादर येथे देशभरातील अनुयायी एकत्र आले होते. चैत्यभूमीला अभिवादन करून परतीचा प्रवास करणा-या अनुयायींना मात्र लोकलसाठी ताटकळत राहावे लागले. परतीचा प्रवास करणारे अनुयायी, पिक अव्हर त्यात मालगाडीचा डबा घसरल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. किमान महापरिनिर्वाण दिनी तरी मध्य रेल्वेने वेळापत्रक वेळेवर राखण्याची गरज असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे देण्यात आली.........................................दिवा स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेमुळे जीवितहानी झाली नाही. तथापि बहुतांशी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. यामुळे तब्बल ६० लोकल फे-या रद्द करण्यात आल्या. तर १०० हून जास्त लोकल फे-या ३० मिनिटांचा लेटमार्क लागला होता.