मुंबई : मुंबईचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाउंडेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशोदेशींच्या तब्बल ७५ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. २० ते २६ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये रंगणार आहे.या महोत्सवात जागतिक पातळीवरचे ५२ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्या व्यतिरिक्त ४ रेट्रोस्पेक्टिव्ह, ३ मराठी, ७ लॅटिन अमेरिकन भाषेतील चित्रपटांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या २९ लघुपटांचाही यात अंतर्भाव आहे. ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टिव्ह, कंट्री फोकस, भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपट असे विविध विभाग या महोत्सवात आहेत. अर्जेंटिना, ब्राझील, पोलंड, फ्रान्स, चिली, अमेरिका, स्पेन, आॅस्ट्रिया, इराण, श्रीलंका या व अशा विविध देशांचे चित्रपट या महोत्सवात असतील. महोत्सवाच्या कालावधीत प्रतिष्ठानच्या प्रांगणात चित्रपटविषयक स्टॉल्स आणि मुक्त व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, या महोत्सवाचे संचालक व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी दिली. (प्रतिनिधी)
यशवंत महोत्सवात देशोदेशीच्या ७५ चित्रपटांचा समावेश...!
By admin | Published: January 10, 2017 5:30 AM