देशमुख प्रकरणात सीबीआय ॲक्शन मोडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:47+5:302021-09-02T04:14:47+5:30
देशमुख प्रकरणात सीबीआय ॲक्शन मोडमध्ये * जावयाचा जबाब नोंदविला, तर वकिलाकडे कसून चौकशी * प्राथमिक अहवाल क्लीन चिट प्रकरण ...
देशमुख प्रकरणात सीबीआय ॲक्शन मोडमध्ये
* जावयाचा जबाब नोंदविला, तर वकिलाकडे कसून चौकशी
* प्राथमिक अहवाल क्लीन चिट प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणाच्या प्राथमिक चौकशी अहवालात माजी मंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या कथित अहवालाने वादंग उठल्यानंतर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयने देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांचे वकील ॲड. आनंद डागा यांना बुधवारी ताब्यात घेतले. चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवून सोडून देण्यात आले. मात्र वकिलाकडे रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्यात येत होता.
वरळी येथील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून बाहेर पडत असताना दहा जणांच्या एका पथकाने चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले. कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता सीबीआयकडून ही कारवाई झाल्याने देशमुख कुटुंबीयांकडून चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र वरळी पोलिसांनी अशा प्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे त्यांना समजावले. चतुर्वेदी हे पेशाने डॉक्टर असून, ते जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात.
सीबीआयने आकस्मिकपणे केलेल्या कारवाईचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर व प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र अधिकाऱ्यांनी त्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला.
आज दुपारी वरळीतील सुखदा इमारतीतून गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा आपल्या गाडीने जात असता सीबीआयने गाडी रोखून त्यांना ताब्यात घेतले. अनिल देशमुख क्लीन चिट कागदपत्रांबाबत चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवून वीस मिनिटांत त्यांना सोडण्यात आले. आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या शनिवारी अनिल देशमुख यांना प्राथमिक चौकशीत क्लीन चिट देण्यात आल्याचा ६५ पानी कथित अहवाल व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. सीबीआयने त्याचा इन्कार करीत या प्रकरणी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, काँग्रेसचे नेेते सचिन सावंत यांनी आजच्या कारवाई यासंदर्भात ट्विट करून मोदी सरकारचा निषेध केला आहे.