पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:07 AM2021-09-18T04:07:45+5:302021-09-18T04:07:45+5:30
सचिन वाझेची ईडीला माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राजकीय दबाव आणि स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी आपण बार व रेस्टॉरंटकडून ...
सचिन वाझेची ईडीला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजकीय दबाव आणि स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी आपण बार व रेस्टॉरंटकडून पैसे उकळल्याची माहिती बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला दिली. तसेच आपल्याला पुन्हा सेवेत एकदा रुजू करून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजी करण्याकरिता अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची माहितीही वाझे याने ईडीला दिली.
ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी वाझे याला मार्च २००४ मध्येही सेवेतून बडतर्फ करण्यात आले. जून २०२० मध्ये त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. मात्र, वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यास शरद पवार यांचा विरोध होता. त्यांना राजी करण्यासाठी देशमुख यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्यावर वाझे याने एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर देशमुख यांनी वाझेला रक्कम देण्यासाठी मुदत दिली, असे वाझे याच्या जबाबात म्हटले. तसेच वाझेने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी अनेक व्यावसायिक आस्थापनांकडून पैसे उकळले आहेत; पण स्वतः कोणताच लाभ घेतला नाही.
बदली रद्द करण्यासाठी १० उपायुक्तांनी ४० कोटी दिले
जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा आदेश काढला. यावर देशमुख व अनिल परब नाखुश होते आणि त्यांनी हा आदेश मागे घेतला. तीन-चार दिवसांनी मला समजले की, आर्थिक तडजोडीनंतर हा आदेश जारी केला. बदलीच्या यादीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून ४० कोटी जमा करण्यात आले. त्यापैकी २० कोटी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांच्याद्वारे देशमुखांपर्यंत पोहोचवण्यात आले तर उर्वरित २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमटे यांच्याद्वारे अनिल परब यांना देण्यात आले, अशी माहिती वाझे याने दिली.
अनिल देशमुखांचा तपासात हस्तक्षेप
अनिल देशमुख यांनी अनेक गुन्ह्यांच्या तपासात हस्तक्षेप केल्याची माहितीही वाझे याने दिली. अनेक वेळा देशमुख मला त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात किंवा सह्याद्रीवर बोलावून काही प्रकरणांत तपासाबाबत सूचना करत. त्यापैकी एक म्हणजे सोशल मीडिया फेक फॉलोअर्स प्रकरण, यामध्ये देशमुख यांना गुन्हेगारांना कारवाई करायची होती. यासंदर्भात मी त्यांना नियमित माहिती देत असे. तसेच टीआरपी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अर्णव गोस्वामी यांना अटक करायची होती, असे वाझे याने जबाबात म्हटले आहे.
अनेक बारकडून पैसे उकळले
मला मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी दिली होती. प्रत्येक बारकडून तीन लाख उकळण्याची सूचना देण्यात आली. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान बार व रेस्टॉरंटकडून ४.७ कोटी उकळले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये देशमुख यांनी मला व्हाॅट्सॲप कॉल केला आणि जानेवारीपर्यंत जमवलेली रक्कम कुंदन शिंदेकडे जमा करण्यास सांगितले. शिंदे यांनी मला कॉल करून ती रक्कम घेऊन सह्याद्री अतिथीगृहाजवळ बोलावले. मी काळी मर्सिडीज घेऊन तिथे पोहोचलो. १.६० कोटी रुपये भरलेल्या पाच बॅग मी शिंदेकडे दिल्या. त्या पाचही बॅग मंत्र्यांच्या पांढऱ्या मर्सिडीजमध्ये ठेवल्या. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये देशमुख यांनी पुन्हा कॉल केला आणि फेब्रुवारीपर्यंत जमवलेली रक्कम घेऊन राजभवनाबाहेर सिग्नलजवळ बोलावले. त्यावेळी तीन कोटी रुपये भरलेल्या ११ बॅग्स घेऊन पोहोचलो. त्या बॅग्स शिंदे यांच्या ताब्यात दिल्या. त्यांनी त्या बॅग्स मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याच्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये ठेवल्या. त्या गाडीत एक हवालदार होता. मला त्याचे नाव आठवत नाही, असे वाझे याने म्हटले आहे. एका बार मालकाने तक्रारीत म्हटले की, वाझे हे पैसे ‘एक नंबर’च्या नावाने उकळत असे. याबाबत ईडीने वाझेकडे एक नंबर म्हणजे तत्कालीन गृहमंत्री देशमुख असल्याचे सांगितले.