* सीबीआयने याच मुद्द्यावर केला गुन्हा दाखल
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब, मुख्य साक्षीदार, निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब, त्याच्याकडील डायरीतील नोंदी आणि मुंबईतील बारमालक महेश शेट्टीचा कबुलीजबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. या बाबी एकमेकांशी पूरक आणि बऱ्यापैकी सुसंगत आढळून आल्याने देशमुख व अन्य ५ अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.
देशमुख यांच्या मुंबई, नागपूरसह विविध ठिकाणची निवासस्थाने आणि कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून त्याबाबत पुरावे मिळविण्यात येत आहेत. त्यासाठी संबंधितांकडे पुन्हा लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
परमबीर सिंग व सचिन वाझे यांच्या जबाबामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य आहे, त्याप्रमाणे एनआयएने जप्त केलेली डायरी सीबीआयने ताब्यात घेतली असून, त्यामध्ये तारखेसह कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी आणि मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याने वाझेला काही महिन्यांत एकूण १ कोटी ५५ लाख रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचे समजते. डायरीत किंवा शेट्टीच्या जबाबात ही रक्कम अनिल देशमुख यांच्यासाठी जमविल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, हप्तावसुली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
या तिघांव्यतिरिक्त देशमुख यांच्यासह इतरांनी वसुलीच्या आरोपांचे पूर्ण खंडन केले आहे. मात्र, त्यांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत त्यांच्याकडे सविस्तर तपास केला जाणार आहे.
चारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि त्यावेळी गुन्हे अन्वेषण शाखेच्या सीआययू विभागाचा प्रमुख असलेल्या सचिन वाझेला देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. मात्र, त्यामध्ये नमूद केलेल्या धक्कादायक आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने आतापर्यंत एकूण संबंधित आठ ते नऊ जणांचे सविस्तर जबाब घेतले आहेत. त्यामध्ये परमबीर सिंग, वाझे यांच्यासह पत्रात उल्लेख असलेले पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच देशमुख, त्यांचे खासगी सचिव संजय पलांडे, स्वीय सहायक एस. कुंदन, बारमालक महेश शेट्टी व याचिकाकर्ती जयश्री पाटील यांचा समावेश असल्याचे समजते.
......................
देशमुख, त्यांचे दोन्ही पीए व दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबात विसंगती असल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला असल्याचे सांगण्यात आले.