मुंबई - संचिन वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची प्रतिमा मलीन झाली असून सरकारच्या विश्वासर्हतेवरच प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणावरु लोकसभेतही गदारोळ पाहायला मिळाला, भाजपा नेत्यांन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. त्यामुळेच, याप्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्येही वेगळीच कुजबूज असल्याची चर्चा आहे. त्यातच, शिवसेना नेते आणि खासदार संजय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून बाण चालवले आहेत.
परमबीर सिंग प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण झाल्याचं राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून म्हटलंय. तसेच, सरकारकडे डॅमेज कंट्रोलची योजना नसल्याचं सांगत, परमवीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाल्याचंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱया घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडत आहेत. जे राष्ट्र आपले चारित्र्य सांभाळण्याची दक्षता घेत नाही ते राष्ट्र जवळजवळ नामशेष झाल्यासारखेच आहे असे खुशाल समजावे. जे राष्ट्र सत्य, सचोटी, सरळपणा आणि न्यायनिष्ठा या सद्गुणांची किंमत जाणत नाही आणि त्या गुणांना मानत नाही ते राष्ट्र जिवंत राहण्यालादेखील पात्र नसते. विलासी वृत्ती हेच ज्या राष्ट्राचे दैवत आहे, ज्या राष्ट्रातील लोक केवळ स्वतःसाठीच जगतात किंवा जेथे एखादी छोटी व्यक्ती स्वतःला देव समजते त्या राष्ट्राचे दिवस भरत आले आहेत, असे खुशाल समजावे. आज आपल्या देशाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाबतीत हे प्रश्न विचारले जात आहेत याचे दुःख वाटते. महाराष्ट्राचे एक मंत्री संजय राठोड यांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण खाली बसत नाही तोच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याचे प्रकरण आजही खळबळ माजवीत आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपपत्रामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून जावे लागेल व सरकार डळमळीत होईल असे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी काहीच घडले नाही. तरीही देशभरात या सर्व प्रकरणावर चर्चा झाली व महाराष्ट्राची बदनामी झाली!, असे राऊत यांनी म्हटलंय.
गृहमंत्र्यांनी तेल ओतले
मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सिंग हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?
देशमुखांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे, दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. 'सौ सोनार की एक लोहार की' असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?