देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ, दोघेही चौकशीसाठी गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:44 AM2021-08-19T09:44:27+5:302021-08-19T09:44:50+5:30

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर चौकशीला पाचारण करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर ईडीचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Deshmukh's father and son turn their backs on the ED office, both absent for questioning | देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ, दोघेही चौकशीसाठी गैरहजर

देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ, दोघेही चौकशीसाठी गैरहजर

Next

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्याबाबत चौकशीला हजर न राहण्याचे धोरण कायम ठेवले आहे. ते व त्यांचे पुत्र ऋषीकेश हे बुधवारी ईडीच्या कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यांच्या वकिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन मुदतवाढ मागितली.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर चौकशीला पाचारण करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर ईडीचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने मंगळवारी दोघांना नव्याने समन्स जारी केला होता. देशमुख यांना पाचव्यावेळी तर ऋषीकेश यांना दुसऱ्यांदा नोटीस काढून बुधवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्यास कळविले होते. मात्र, आजही ते हजर झाले नाहीत. त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटून पत्र दिले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यावर न्यायालयाने अंतिम आदेश दिल्यानंतर देशमुख कुटुंबातील व्यक्ती चौकशीला हजर राहतील, तोपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. तपास यंत्रणेला सर्व सहकार्य करण्यात येत असून ते पुढेही कायम राहील.’
दर महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीचा देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.

Web Title: Deshmukh's father and son turn their backs on the ED office, both absent for questioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.