आयटी विभागाचे आॅनलाइन मूल्यांकनावर ताशेरे, देशमुख यांचा राजीनामा मागितला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 02:54 AM2017-09-27T02:54:25+5:302017-09-27T02:54:34+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे. माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार विभागाने केलेल्या सूचना पाळण्यात आल्या नसल्याचे म्हटले आहे.
विद्यापीठातील निकाल गोंधळामुळे खुद्द राज्यपालांनी या प्रकरणी लक्ष घातले. त्यानंतरही गोंधळ सुरूच होता. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या चमूने कलिना कॅम्पसला भेट दिली. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाला अहवाल दिला. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत अनेक तांत्रिक अडचणी आल्याचे अहवालात नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. अहवालाच्या आधारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देशमुख यांचा राजीनामा मागितला?
मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. देशमुख यांना राजभवनातर्फे राजीनामा देण्यास सांगितल्याचे समोर येत आहे. रविवारी त्यांना राजभवनात बोलाविण्यात आले होते. राज्यपालांसह त्यांची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.