अवयवदानाची इच्छा राहिली अपूर्ण !
By admin | Published: October 15, 2016 07:04 AM2016-10-15T07:04:49+5:302016-10-15T07:04:49+5:30
प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी गुरुवारी गळफास घेत आयुष्य संपविले. मृत्यूनंतर अवयवदानाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
मुंबई : प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी गुरुवारी गळफास घेत आयुष्य संपविले. मृत्यूनंतर अवयवदानाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ही इच्छा अपूर्णच राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जगदीश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठविला होता. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे उघड झाल्याचे वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मृत्यूनंतर अवयवदान करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र गळफास घेतल्याने त्यांचा ‘ब्रेन डेड’ झाला. तसेच सकाळी नऊच्या दरम्यान त्यांनी गळफास घेतल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. ही बाब पोलिसांना समजल्यापासून जगदीश यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन होईपर्यंत बराच उशीर झाला. तसेच त्यांचे वयही जास्त होते, त्यामुळे यांचे अवयव निकामी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते इतर रुग्णांसाठी वापरता येणार नसल्याने त्यांची अखेरची इच्छा अपूर्णच राहिली.
गोरेगाव पूर्वेच्या आकृती इमारतीत जगदीश एकटेच राहत होते. त्यांच्याशी पटत नसल्याने त्यांच्या पत्नी ड्यूलिसिम (६२) व दोन मुले त्यांच्यापासून वेगळे राहत होते. कांदिवलीला राहणारे त्यांचे नातेवाईकच त्यांचा सांभाळ करायचे. जगदीश यांचा पत्नीसोबत वाद सुरु होता. त्यांनी एकमेकांवर केसेसही केल्या होत्या. (प्रतिनिधी)