अरुण दातेंसोबत गाणे करण्याची इच्छा अधुरीच राहिली; अशोक पत्कींची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:58 AM2022-10-06T11:58:05+5:302022-10-06T11:58:45+5:30
‘शुक्रतारा मंदवारा’च्या ६०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित विशेष संगीत सोहळ्यामध्ये पहिला अरुण दाते कला सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्की बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरुण दातेंच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार आपल्याला मिळाल्याचा खूप आनंद आहे. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केल्याबद्दल आभारी आहे; पण दाते आणि माझे एक स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी माझ्यासाठी एक तरी गाणे गायला हवे होते. त्यांच्यासाठी एखादे गाणे कम्पोझ करण्याची इच्छा अधुरीच राहिल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याच्या ६०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित विशेष संगीत सोहळ्यामध्ये पहिला अरुण दाते कला सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्की बोलत होते. ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ होते.
पत्की म्हणाले की, दाते शिखरावर असताना मी नवखा होतो. गाणे बनवायला मिळावे, यासाठी मी कधीच कोणाकडे गेलो नाही. त्यामुळे कदाचित दातेंसोबत गाणे करण्याचा योग जुळून आला नसावा. ‘अधुरी एक कहाणी’ या गाण्याचे टायटल साँग केले तेव्हा मंगेश पाडगावकरांपासून बरेच जण नाराज झाले; पण दातेंनी मात्र कौतुक करत मला मिठी मारली. अशी चाल मला गायला मिळाली असती तर सोने झाले असते, असे दाते म्हणाले होते. दातेंच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटते, असेही पत्की म्हणाले.
प्रवीण दवणे यांनी अरुण दातेंच्या विविध आठवणींना उजाळा दिला. दवणे म्हणाले की, साक्षात पत्कीसाहेबांसोबत हा पुरस्कार मिळाल्याने आनंदाचा गुणाकार झाला आहे. ‘मुक्या हुंदक्यांचे’ या गाण्याला पत्कींनी संगीत दिले आहे. त्यांनी अगोदर चाल बांधली आणि त्यावर मी शब्द लिहिले. त्यामुळे या गाण्याच्या यशाचे श्रेय पत्कींना जाते. चालीतील कविता जर कवीला शोधता आली तर ते चांगले भावगीत बनते. दातेंसोबत ‘शुक्रतारा’च्या जवळपास पावणे दोनशे शोचे निवेदन करण्याचे भाग्य लाभल्याचेही दवणे म्हणाले.
संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा ठरलेल्या अरुण दातेंसारख्या व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार आपल्या हस्ते पत्की आणि दवणे या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना देण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचे सांगत शेलार म्हणाले की, खरे तर यांचे राग वेगळे आमचे राग वेगळे. यांच्या चाली वेगळ्या आमची चाल वेगळी. यांचे शब्द वेगळे आमचा आवाज वेगळा. तरीही अतुल यांनी मला हा पुरस्कार देण्यासाठी बोलावले कारण संगीताला, गाण्याला किंवा कोणत्याही कलाकृतीला मर्यादा किंवा सीमा नसतात. कला ही सर्व मर्यादांच्या पलीकडची असते. आम्ही आयुष्यात कितीही बेसूर होण्याचा प्रयत्न केला तरी पत्की सरांचे सूर आम्हाला बेसूर होऊ देणार नाहीत. दवणे सरांनी दिलेली शब्दरुपी दत्ताची पालखी अखंडितपणे खांद्यावर वाहू, असेही शेलार म्हणाले.
अतुल दाते यांनी ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याची जन्मकथा सांगितली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संगीत सोहळ्यात मंदार आपटे, पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी व श्रीरंग भावे यांनी दाते, पत्की आणि दवणे यांची ‘श्री राम जय राम, स्वरगंगेच्या काठावरती, दिस चार झाले मन, केतकीच्या वनी, नावीका रे, मुक्या हुंदक्याचे, चिंब भिजलेले, संधिकाली, निघालो घेऊन, ती भेटली पुन्हा, माघाची थंडी, जपून चाल, नकळतां असे, भातुकलीच्या, या जन्मावर, शुक्रतारा मंदवारा’ ही गाणी सादर सादर केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"