इच्छुक उमेदवार संभ्रमात

By admin | Published: October 6, 2015 02:54 AM2015-10-06T02:54:27+5:302015-10-06T02:54:27+5:30

केडीएमसीच्या निवडणुकीत युती व्हावी की नाही, यासाठी सेना-भाजपा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड खल सुरू आहे. पंधरवड्यात तीन बैठका झाल्या, परंतु त्यातून अद्यापही

Desired candidate confusion | इच्छुक उमेदवार संभ्रमात

इच्छुक उमेदवार संभ्रमात

Next

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली
केडीएमसीच्या निवडणुकीत युती व्हावी की नाही, यासाठी सेना-भाजपा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड खल सुरू आहे. पंधरवड्यात तीन बैठका झाल्या, परंतु त्यातून अद्यापही तिढा सुटला नसल्याने कार्यकर्त्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. एकीकडे दोन्ही पक्षांकडून १२२ जागांसाठी मुलाखती घेण्याचे नियोजन असतानाच मध्येच युतीची चर्चा वरिष्ठांकडून सुरू असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
इच्छुक उमेदवारांचीही कोंडी झाली आहे. उमेदवारांच्या हातात अवघे २५ दिवस उरलेले असताना नेमके तिकीट कोणाला मिळणार, याचीही निश्चिती पक्षांकडून झालेली नाही. विशेषत: भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांना याबाबतची उत्कंठा सर्वाधिक आहे. १३ आॅक्टोबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असून त्याच्या दोन-एक दिवस आधी युती होणार की नाही हे जाहीर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. अन्य पक्षांमधील मनसेच्या ठरावीक ठिकाणच्या संभाव्य उमेदवारांनी आपापले वॉर्ड राखण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी प्रचार यंत्रणाही सुरू केली आहे. राष्ट्रवादीमधून भाजपात आलेल्या डोंबिवलीतील ‘त्या’ लोकप्रतिनिधींनीही तिकिटाला तिकीट मिळण्याची हमी असल्याने प्रचार सुरू केला आहे. कल्याणमध्ये पूर्वेत आणि पश्चिमेला काही ठिकाणी असे चित्र दिसून येत आहे.

आचारसंहिता भंग प्रकरणी भाजपाला नोटीस
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मनपा निवडणुकीच्या प्रचारात ६,५०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करून मतदारांची दिशाभूल आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांसंदर्भात तक्रार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंदर्भात नागपूरमध्ये पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या तरी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही.

चर्चाच चर्चा
आघाडीबाबतची चर्चा निष्फळ ठरणार का, असे चित्र निर्माण झाले आहे. आघाडीसाठी बुधवारी मुंबईत बैठक झाली, परंतु दुसऱ्या दिवशी जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने काँग्रेसने १२२ जागांसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी दिवसभर त्या मुलाखती पार पडणार आहेत. मनसेची मात्र सध्या एकला चलो रे भूमिका आहे.

विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने आता ठाणे पोलीस काळजी घेत आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेचा भंग होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनांतर्गत शस्त्र परवानाधारकांना आपली शस्त्रे ताब्यात बाळगण्यास मनाई केली आहे.
यासंदर्भातील आदेश ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहेत. शस्त्रांसाठी छाननी समितीने ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांना शस्त्रबंदी हा मनाई आदेश लागू राहणार नाही, असेही स्पष्ट केले. या काळात राजकीय पक्षांनी प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, आदींमुळे रहदारीस अडथळा वा वाद निर्माण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
राजकीय स्पर्धेतून वाद झाल्यास दखल किंवा अदखलपात्र गुन्हे दाखल होऊ शकतात. हे लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयाच्या १०० मीटर बाजूकडील परिसरात फक्त तीन वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Desired candidate confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.