Join us

युती होऊनही विधानसभेत भाजपाची कसरत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 6:18 AM

कार्यकर्त्यांचा सूर; सेनेला समान वाटा का?

यदु जोशी

मुंबई : भाजपा-शिवसेना युतीचा दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत फायदा होईल; मात्र विधानसभा निवडणुकीत १४० जागाही लढायला मिळणार नसल्याने कुचंबणा होईल, असा सूर भाजपात उमटत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जादा वाटा दिला, असे बोलले जात आहे.

विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की, २०१४ मध्ये १२२ जागा जिंकणाऱ्या भाजपाला १३८ जागा आणि ६३ जागा जिंकणाºया शिवसेनेलाही तेवढ्याच जागा देणे हा भाजपावर अन्याय आहे. २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात भाजपाचा विस्तार केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात भाजपा नंबर वनचा पक्ष बनला. युतीमध्ये पूर्वी शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाची स्थिती मजबूत झाली. मुंबई महापालिकेत भाजपाने शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळविले.

शिवसेनेकडून रोजच्या रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर होणाºया टीकेमुळे युतीची शक्यता मावळली होती. त्यामुळे शिवसेनेकडील मतदारसंघांत भाजपाच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. युती झाल्यामुळे त्यांच्या इच्छाआकांक्षांवर पाणी फिरले आहे. आगामी सर्व निवडणुका युती करून लढू, असे फडणवीस यांनी जाहीर केल्याने तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण करणारे भाजपाचे कार्यकर्ते अधिकच धास्तावले आहेत.विधानसभच्या १३८ जागा लढवून गेल्या वेळपेक्षा अधिक चांगले यश मिळविण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल. शिवसेना सोबतीला असली तरी हे आव्हान सोपे नसेल. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपांत असा सूर आहे की, लोकसभेसाठी युती लाभदायक ठरेल, पण विधानसभेला आमच्या वाट्याला फारच कमी जागा आल्या आहेत. शिवसेनेने पूर्वी जिंकलेल्या किमान दहा जागा २०१४ मध्ये भाजपाने जिंकल्या होत्या. त्या परत मिळाव्यात म्हणून शिवसेना जोर लावेल. त्यामुळे भाजपाच्या काही विद्यमान आमदारांवरही गंडांतर येऊ शकते. तसेच शिवसेनेबाबतही घडू शकेल. पण शिवसेनेची आक्रमकता बघता ते स्वत:कडील जागा सोडतील का, याबाबत साशंकता आहे.

मित्रपक्षांना देऊन झाल्यानंतर विधानसभेच्या उर्वरित जागा भाजपा-शिवसेना समसमान वाटून घेणार आहे. रिपाइं, शिवसंग्राम, रासपा यासारख्या मित्रपक्षांना २८८ पैकी १२ जागा सोडल्या तर २७६ जागा उरतात. म्हणजे भाजपा-शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी १३८ जागा येतील. लोकसभा निवडणुकीतील युती विधानसभेला टिकेल का, या बाबत साशंकता व्यक्त होत आहे. कारण, दोघांनाही आपापल्या पक्षातील इच्छुकांचे समाधान करताना नाकीनऊ येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पत्करली जोखीमनरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची वाट सुकर व्हावी, यासाठी स्वत:ची वाट खडतर करण्याची जोखीम मुख्यमंत्र्यांनी पत्करली. विधानसभेत भाजपाच नंबर वन राहील, हा आत्मविश्वास असल्यानेच फडणवीस यांनी समान जागांचा फॉर्म्युला मान्य केला, असे त्यांचे निकटस्थ सांगतात.

 

टॅग्स :शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस