मुंबई - लॉकडाऊनमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमधून काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली. मात्र, कोरोना संसर्गचा धोका असल्याने या विभागातील काही कर्मचारीच कामावर येण्यास तयार नाहीत. तसेच, यंत्रणा नवीन असल्याने आॅनलाईन अर्ज केल्यानंतरही सदस्यांच्या बँक खात्यांवर निर्धारीत वेळेत पैसे जमा होत नसल्याची माहिती हाती आली आहे.
भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचा-यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा देणारा आदेश केंद्रिय कामगार मंत्रालयाने जारी केला आहे. त्यासाठी पीएफ कार्यालयत प्रत्यक्ष येण्याची गरज नसून त्यासाठी या विभागाच्या आयएसडी विंगने सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. वेबसाईटवर असलेल्या लिंकवर अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील असे सांगण्यात आले आहे. मात्र, ३० आणि ३१ मार्च रोजी अर्ज केलेल्यानंतरही आजवर पैसे मिळाले नसल्याची तक्रार काही सदस्यांकडून केली जात आहे.
आॅनलाईन अर्ज असले तरी पैसे जमा करम्यासाठी आवश्यक असलेली जुजबी प्रक्रिया करण्यासाठी पीएफ कार्यालयातील किमान १० टक्के कर्मचा-यांना कामावर येणे क्रमप्राप्त आहे. मात्र, तशा सुचना दिल्यानंतरही बहुतांश जण कोरोन आणि पोलिसांच्या धास्तीमुळे येत नाहीत. तसेच, सिस्टीम नवी आहे. त्यामुळे आॅनलाईन अर्जांवर पुढिल प्रक्रिया करून बँक खात्यांवर पैसे जमा होऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून हाती आली आहे.
------------------------------------
पुढल्या आठवड्यापासून पैसे मिळतील
लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर पीएफ कार्यालयातील कर्मचा-यांचा अत्यावश्यक सेवत समावेश केलेला नव्हता. मात्र, तो समावेश आता झाला असून आपले आयकार्ड दाखवून त्यांना कार्यालांमध्ये पोहचता येईल. तसेच, या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी कर्मचारी आता तयार झाले आहेत. लवकरच काम सुरळीत होईल आणि येत्या सोमवारपासून पैसे मिळू लागतील असा विश्वास ठाणे पीएफ कार्यालयातील एका वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केला आहे.
-----------------------------------
आमचेच पैसे आम्हाला
कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून कपात करूनच पीएफ खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाते. त्यामुळे ही रक्कम काढण्याची मुभा देत सरकारने आमच्यावर कोणतेही उपकार केले नाहीत. शेकडो कर्मचारी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आपल्या तिजोरीतूनही थोडीफार तजवीज करायला हवी अशी प्रतिक्रीया कर्मचा-यांकडून व्यक्त होत आहे.