बंदी असूनही पर्यटकांची हुल्लडबाजी

By Admin | Published: July 24, 2016 03:51 AM2016-07-24T03:51:29+5:302016-07-24T03:51:29+5:30

कर्जत तालुक्यातील तलाव आणि धरणांवर प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. पोलीस यंत्रणा त्यासाठी नियोजन करीत असताना धोकादायक सोलनपाडा धरणावर जमावबंदी

Despite the ban the tourists' ranting | बंदी असूनही पर्यटकांची हुल्लडबाजी

बंदी असूनही पर्यटकांची हुल्लडबाजी

googlenewsNext

नेरळ : कर्जत तालुक्यातील तलाव आणि धरणांवर प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. पोलीस यंत्रणा त्यासाठी नियोजन करीत असताना धोकादायक सोलनपाडा धरणावर जमावबंदी असताना देखील पर्यटक जीव धोक्यात घालून तेथे येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांना कोणी ऐकत नसून, पुन्हा दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सोलनपाडा ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
१७ जुलै रोजी सोलनपाडा येथील धरणांवर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवार, १८ जुलै रोजी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील सर्व तलाव आणि धरणावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथील ग्रामस्थांनीही पर्यटकांकडून भातशेती आणि जमिनीवर होत असलेले प्लास्टिक आणि मद्याच्या बाटल्या यांचा खच पाहून बंदीची मागणी तहसीलदार कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. तरी देखील हुल्लडबाज पर्यटकांकडून सोलनपाडा परिसरात येणे थांबले नव्हते. पर्यटक जंगलातील रस्त्याने ग्रामस्थांची नजर चुकवून धरणावर पोहोचत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

जमावबंदी आदेश
जमावबंदी म्हणजे संपूर्ण परिसरात प्रवेश करण्यास बंदी असून, पोलिसांना जमाव बंदी आदेश मोडणाऱ्यांच्या विरु द्ध कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
त्यासाठी प्रामुख्याने सोलनपाडा येथे पर्यटक जाऊ नयेत, यासाठी पोलीस कशेळे-जामरुख रस्त्यावर कोठिंबे येथे थांबून पुढे जाण्यास मज्जाव करणार आहेत.
कोठिंबे येथून सोलनपाडा ८ किमी अंतरावर असून, तेथे जाण्यासाठी अन्य कोणताही रस्ता नाही. त्यामुळे कर्जत पोलीस कोठिंबे येथून पर्यटकांना पुन्हा परत पाठवतील, असा विश्वास कर्जतचे पोलीस निरीक्षक अजामुद्दीन मुल्ला यांना आहे.
दुसरीकडे तालुक्यातील पाली भुतीवली, पळसदरी, साळोख, डोंगरपाडा, खांडपे, पाषाणे, अवसरे, कशेळे येथील धरणांवर कोणी पर्यटक जाणार नाहीत, याची काळजी कर्जत आणि नेरळ पोलीस घेतील, अशी माहिती कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी दिली.

पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे होतात वाद
सोलनपाडा ग्रामस्थ हे गावाच्या बाहेर झोपडी बांधून बसले आहेत. धरणावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जमावबंदी आदेश लागू असल्याचे सांगत आहेत. त्याचवेळी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यात अडवत आहेत. मात्र पर्यटक जंगलातील रस्त्याने ग्रामस्थांची नजर चुकवून धरणावर पोहोचत आहेत.
पर्यटकांच्या अशा पद्धतीच्या वागण्याला सोलनपाडा ग्रामस्थ कंटाळले आहेत, कारण जमावबंदी आदेश असल्याने धरणावर कोणी येणार नाही, असे ग्रामस्थांना वाटले होते. मात्र पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा वाद होत आहेत.

सुटी वगळता इतर दिवशी वेगवेगळ्या मार्गाने सोलनपाडा येथे आलेले पर्यटक यांनी नेहमीप्रमाणे शेतात दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पर्यटकांची हुल्लडबाजी थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी सोलनपाडा व टेंबरे ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Despite the ban the tourists' ranting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.