अंध असूनही ‘ती’ने ५० मिनिटांत वाजविली ५० वाद्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:32 AM2018-06-26T02:32:50+5:302018-06-26T02:32:54+5:30
अंध असूनही ५० मिनिटांत ५० वाद्ये वाजवण्याचा विक्रम नोंदवण्याची किमया योगिता तांबे यांनी केली आहे.
मुंबई : अंध असूनही ५० मिनिटांत ५० वाद्ये वाजवण्याचा विक्रम नोंदवण्याची किमया योगिता तांबे यांनी केली आहे. त्या जोगेश्वरीतील अस्मिता विद्यालय येथे वाद्यशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दादर (पू.) येथील श्रीमती कमला मेहता दादर स्कूल फॉर दी ब्लाइंड या शाळेमध्ये सोमवारी त्यांनी केलेल्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
‘आजकाल संगीत क्षेत्रामध्ये डीजे संस्कृतीने थैमान घातले आहे. लग्न समारंभापासून ते बारशापर्यंत डीजेव्यतिरिक्त काहीही नसते. त्यामुळे सनई-चौघडा अशी पारंपरिक वाद्येही लोप पावत चालली आहेत. गणपतीच्या कृपेने माझ्या हाती जी कला आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा आहे,’ अशी प्रतिक्रिया योगिता तांबे यांनी दिली.
याप्रसंगी नाट्यशाळेच्या प्रमुख कांचन सोनटक्के, श्रीमती कमला मेहता दादर स्कूल फॉर दी ब्लाइंड शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांची उपस्थिती होती.
योगिताने वाजवली ही वाद्ये-
तबला, ढोलकी, नगारा, दिमडी, हलगी, ढोलक, नाशिक ढोल, ताशा, डमरू, संबळ, टाळ, मंजिरी, खंजिरी, झांज, घुंगरू, खलबत्ता, करवंटी, चिपळ्या, नारळ, ताट-चमचा, हंडा, बगलबच्चा, लेझीम, पखवाज, शिटी, पिपाणी, हार्मोनियम, डफ, घंटा, छोटी घंटा, शंख, ताम्हण, कलश, तुणतुणा, खुळखुळा, चौंडक, सुप, दगड, ग्लास, स्टील प्लेट, तुतारी, पितळीची वाटी, काथ्या, चाबूक, बांगड्या, परात इत्यादी पारंपरिक वाद्ये ५० मिनिटांत त्यांनी वाजविली.