Join us

गंभीर जखमी होऊनही महिलेचा आवाज वाचला; राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:28 PM

रक्तबंबाळ होऊन अत्यवस्थ झालेल्या या महिलेला तिच्या नातेवाइकांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दखल केले.  

मुंबई : एका प्राणघातक हल्ल्यात मानेवर वार होऊन गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आवाज वाचविण्यात पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. महिलेच्या मानेवर खोलवर झालेली जखम स्वरयंत्रापर्यंत पोहोचल्याने निर्माण झालेला धोका टळला आहे. राजावाडी रुग्णालयात १७ मार्च रोजी ३९ वर्षीय विवाहितेला गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले होते. या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात रक्तबंबाळ होऊन अत्यवस्थ झालेल्या या महिलेला तिच्या नातेवाइकांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दखल केले.  

श्वसननलिकेवर केले उपचार 

महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले तेव्हा जखमेमुळे श्वसननलिकेसह खुली झाली होती. तसेच प्रचंड रक्तस्रावदेखील झाला होता. जखम स्वरयंत्रापर्यंत खोलवर असल्याने एकाच वेळी या सर्व बाबींवर उपचार करणे आवश्यक झाले होते. अशा वेळी तातडीने श्वसननलिकेवर उपचार करत या महिलेचे प्राण वाचविले. तसेच स्वरयंत्रावरही उपचार केले. त्यानंतर या महिलेस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते, अशी माहिती रुग्णालयातील कान, नाक, घसा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रितू शेठ यांनी दिली. 

वैद्यकीय चमूने दिले योगदान राजावाडी रुग्णालयातील कान, नाक, घसा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रितू के. शेठ यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय चमूने अवघ्या काही क्षणांत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. देविका शेरे, निवासी वैद्यकीय अधिकारी पूर्णिमा कुमार, डॉ. सुब्रमण्यम अय्यर आणि भूलतज्ज्ञ डॉ. योगिता किंजाले, त्यांचे सहकारी डॉ. महेश डोंगरे या वैद्यकीय पथकाने युद्धपातळीवर शस्त्रक्रिया केली. 

पालिकेची उपनगरीय रुग्णालयेराजावाडी रुग्णालयात दर महिन्याला कान, नाक, घसासंबंधी सुमारे दीड हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यातील सुमारे ३०० ते ४०० प्रकरणे ही तातडीच्या स्वरूपाची असतात. मानेच्या दुखापतींनी ग्रस्त रुग्णही मोठ्या संख्येने येतात. महिन्याला सरासरी ७० शस्त्रक्रिया या रुग्णालयात करण्यात येतात. तरीही असे आपत्कालीन प्रसंग व त्यातून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन रुग्ण बरा होणे, याचे समाधान काही औरच असते. - डॉ. विद्या ठाकूर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक

 

टॅग्स :हॉस्पिटल