उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतरही शिवसेनेबाबत पंतप्रधान सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 12:58 AM2019-01-02T00:58:59+5:302019-01-02T00:59:10+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर आहे!’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका चालविली असतानाही स्वत: पंतप्रधान मोदी यांनी मात्र शिवसेनेबाबत आपण सकारात्मक असल्याचे संकेत एका मुलाखतीत दिले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर आहे!’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका चालविली असतानाही स्वत: पंतप्रधान मोदी यांनी मात्र शिवसेनेबाबत आपण सकारात्मक असल्याचे संकेत एका मुलाखतीत दिले.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळून चौकीदार चोर असल्याची टीका करत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर मित्रपक्ष आपल्याला बेडक्या दाखवत आहेत का? या प्रश्नात मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांचे त्या-त्या राज्यातील एक राजकारण असते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा असे वाटणे साहजिक आहे. एनडीएतील घटक पक्षांना वाढण्यापासून रोखण्याची भूमिका भाजपाने कधीही घेतली नाही. काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षांबाबत मात्र ते केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच्या पत्र परिषदेत ठाकरे यांच्या मोदीविरोधी वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. सूर्यावर थुंकायला गेलात तर थुंकी तुमच्यावरच पडते, असे त्यांनी सुनावले होते.
मुख्यमंत्र्यांनी इतकी टीका केल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मुख्यमंत्र्यांना झोडपले जाईल, असे वाटत असतानाच आज त्याविषयी एका शब्दानेही या मुखपत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली नाही. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेलादेखील युतीची शक्यता संपुष्टात आणायची नाही, असे संकेत मिळाले.