११ लोकांचा मृत्यू होऊनही शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:02+5:302021-03-31T04:06:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कमी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटून गेलेले असतानासुद्धा अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा साधे चौकशीसाठीसुद्धा ताब्यात घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील खाटा अधिग्रहित करण्याच्या यादीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. यातून शिवसेनेच्या वरदहस्तामुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते हे सिद्ध होते, असा आरोप मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धे व महापालिकेतील कर्मचारी यांना उपचार घेता यावा या सबबीखाली सनराइज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा ‘रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. २५ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ दहा दिवसात नाममात्र प्रक्रिया करून ६ मे २०२०ला परवानगी देण्यात आली. असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेशी नसल्याची माहिती असूनसुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला अशी टीका त्यांनी केली.
मुंबईत मागील दहा वर्षांत झालेल्या अनेक आगींच्या घटना घडल्या. कमला मिल येथील दुर्घटना असो किंवा मागच्या वर्षी सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग असो किंवा त्या अगोदरच्या अनेक घटनांमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आलेले होते किंवा अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, हे समोर आलेले असतानासुद्धा ‘टक्केवारीपूर्ण’ काम करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने त्याकडे कानाडोळा करण्याचे काम केले, असा आरोपसुद्धा आमदार भातखळकर यांनी केला.
लोकांचा जीव गेला तरी चालेल, परंतु टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील हे पाहण्यातच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मश्गुल असल्याची टीकासुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.
------------------