Join us

देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 7:29 PM

मलिकांच्या राष्ट्रवादीतील उपस्थितीमुळे भाजपाची होणार कोंडी, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मलिकांना मानाचं स्थान

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व येथून अणुशक्तीनगरपर्यंत काढण्यात आली. यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील अजितदादांचे स्वागत करत यात्रेत सहभाग घेतला. मात्र त्यानंतर अणुशक्तीनगर येथे अजित पवारांची जनसन्मान यात्रा पोहचल्यानंतर तिथे व्यासपाठीवर नवाब मलिक आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. नवाब मलिकांना सोबत घेण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होते. मात्र भाजपाचा विरोध आणि फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवत आज अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेतल्याचं चित्र दिसून आले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा आणि नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका चांगलीच गाजली होती. त्यात नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले होते. मात्र फडणवीसांनीही नवाब मलिकांचे मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींसोबत संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली त्यात नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होत त्यांना अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले. परंतु राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे २ गट पडले. त्यात ४० हून अधिक आमदार अजित पवारांसोबत गेले. 

यात नवाब मलिक कुणाकडे जाणार अशी चर्चा कायम होत राहिली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याचे दिसून आले. त्यावेळी मलिक अजितदादांसोबत गेल्याचं बोललं जात होते. मात्र तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून या गोष्टीचा विरोध केला. मात्र तरीही नवाब मलिक आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांसोबत व्यासपीठावर दिसले त्यामुळे राष्ट्रवादीने उघडपणे देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवत भाजपाचा विरोध डावलल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पत्रकारांनी आज मलिकांवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी याबाबत मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केलेली आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' पत्रात नेमकं काय?

श्री.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे 

आपला 

देवेंद्र फडणवीस

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीसनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४