मुंबई : ‘महा’ चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही त्याच्या असलेल्या किंचित प्रभावामुळे शुक्रवारी सकाळी मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार सरी कोसळल्या. त्यानंतर शनिवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. महत्त्वाचे म्हणजे पावसाचे ढग पूर्णत: हटल्याने मुंबईत रखरखीत ऊन पडले होते. किंचित कुठे तरी ढगाळ वातावरण असले तरी त्याचे प्रमाण कमी होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर असलेले ‘बुलबुल’ हे अतितीव्रचक्रीवादळ शनिवारी उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर होते. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर उर्वरित भागात उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तसेच विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झालेली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
मुंबईत मात्र शनिवारी पावसाने विश्रांती घेतली होती. रखरखीत ऊन पडल्याने मुंबईकरांना तापदायक वातावरणाचा सामना करावा लागला. हवामानात होत असलेल्या किंचित बदलामुळे १० नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ११ नोव्हेंबर रोजीही आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
>मुंबईत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली होती. दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडल्याने मुंबईकरांना तापदायक वातावरणाचा सामना करावा लागला. किंचित कुठे तरी ढगाळ वातावरण असले तरी त्याचे प्रमाण मात्र कमी होते.