मुंबई : आज आपण एका अशा हॉटेलविषयी माहिती घेणार आहोत, जिथे तुम्ही-आम्ही सगळ्यांनी एकदा तरी जायलाच हवं. प्रत्येक हॉटेलची एक वेगळी खासियत असते. आता हॉटेल म्हटलं की तिकडची खासियत म्हणजे तिकडचं जेवण. तुमच्या जीभेचे चोचले ज्याठिकाणी पुरवले जातात तिच हॉटेल तुमची फेव्हरिट होतात. पण नवी मुंबईत असं एक हॉटेल आहे, जे हॉटेल तिकडच्या खाद्यपदार्थामुळे तर प्रसिद्ध आहेच पण हॉटेल मालकीणीमुळे ते हॉटेल फार प्रसिद्ध झालंय. या हॉटेलची मालकीण म्हणजे डाऊन सिड्रेम या आजाराचा लहानपणापासून सामना करणारी आदिती वर्मा. जन्मत:च विशेष म्हणून जन्माला आली आदिती खरंच सगळ्यांसाठीच विशेष ठरली आहे.
नवी मुंबईतील भूमी मॉलमध्ये आदितीज कॉर्नर नावाचं तिचं छोटंसं कॅफे आहे. वयाच्या 23 व्या वर्षी ती एका कॅफेची मालकीण आहे. तिच्या हाताची चव चाखण्यासाठी अनेकजण इकडे येत असतात. डाऊन सिड्रोमचा आजार असूनही आदिती व्यावसायिक झाली आहे हे ऐकून सारेच थक्क झालेत. तिचा जीवनप्रवासही इतरांसाठी तितकाच प्रेरणादायी ठरला आहे.
दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आदितीला घरी बसून राहण्याचा फार वैताग येत असे. म्हणून ती तिच्या आई-बाबांसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जात असे. आई-बाबांच्या ऑफिसच्या व्यवहाराचा हिशोब ठेवण्याचं ती काम करत होती. मात्र कालांतराने या कामाचाही तिला कंटाळा येऊ लागला. एकदा तिने त्या ऑफिसमध्ये एका इसमाला चहा घेऊन येताना पाहिलं. तिला हे काम करण्याची इच्छा निर्माण झाली. तिच्या इच्छेखातर आदितीच्या आईवडिलांनी तिला त्यांच्या ऑफिसच्याच इथे एक कॅफे सुरू करून दिलं. आदितीज कॉर्नर असं तिच्या कॅफेचं नाव आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताच एक छान संदेश तिने गेटवर लिहून ठेवला आहे. कठोर मेहनत करणं हे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. पण कोणीही उपाशी पोटी काम करू शकत नाही. या एका वाक्यावरूनच आदितीची आपल्या कॅफेवरची निष्ठा कळून येते.
युअर स्टोरी या ऑनलाईन संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार तुम्हाला या कॅफेमध्ये मॅगी, अंडी, सँडवीच, चहा, कॉफी हे खायला मिळेल, त्याचप्रमाणे या कॅफेतर्फे नेहमीच्या ऑफिस कर्मचाऱ्यांना खानावळही देण्यात येतं. येथे खानावळ लावलेल्या प्रत्येक कर्मचारी इकडच्या जेवणाचा चाहता झाला आहे. अगदी घरच्या चवीचं जेवण इथं मिळत असल्याने आम्हाला आमच्या आरोग्याचीही काळजी करावी लागत नाही, असं ग्राहक सांगतात. आदितीला लहानपणापासूनच जेवण बनवण्याची आवड होती. ती युट्यूबवर अनेक रेसिपी पाहत असत. तिची ही आवड पाहता आम्ही तिला कॅफे सुरू करण्यासाठी पाठिंबा दिला. सुरुवातीला आम्हाला थोडीशी भीती होतीच. तिला हा एवढा भार झेपेल की नाही याबाबत शाश्वती नव्हती. मात्र तिने ही जबाबदारी लिलया पेलली आहे.
आदितीचे वडिल अमित शर्मा म्हणतात की, ‘आपली मुलं जशी आहेत, तशीच त्यांना स्विकारा. ज्या मुलांना लहानपणापासूनच डाऊन सिन्ड्रोम असतो, ती मुलं खरंच गोड असतात. आणि मला आदितीसारखी मुलगी मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो. त्यांना आपण अधिक संरक्षण देत गेलो की अधिक बिथरतात, त्यापेक्षा त्यांना हवं तसं जगू देणंच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.’
‘मला कुकींगची आवड आहे, त्यामुळे मला माझं स्वतःचं हॉटेल असावं असं मला वाटलं. या स्वप्नाची सुरुवात मी माझ्या कॅफेपासून केली आहे. आता माझं लक्ष्य आहे फाईव्ह स्टार हॉटेलकडे. माझ्या आई-वडिलांच्या पाठिंब्याने मी तेसुद्धा करून शकेन.’आदितीने आपल्या आजारावर मात करून जगातल्या प्रत्येकाला एक प्रेरणा दिली आहे. एखादी गोष्टी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्यांचा आधार घेत आपलं स्वप्न साकार केलं पाहिजे, असाच संदेश आपल्याला आदिती वर्माकडून मिळतो. मग जाणार ना तुम्हीही आदिती कॅफेमध्ये.
आणखी वाचा - मुंबईतल्या खवय्यांसाठी या खाऊ गल्ल्या आहेत फेव्हरेट प्लेस