"सीनिअर असूनही मला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, पण..."; भास्कर जाधव अखेर स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:33 PM2023-03-01T16:33:58+5:302023-03-01T16:35:05+5:30
मी आज उघडपणे शिंदे गट, भाजपाच्या नेत्यांना तोंड देतोय. मला माहित्येय आगामी निवडणुकीत हे सगळे माझ्यावर तुटून पडणार आहेत.
मुंबई-
मी आज उघडपणे शिंदे गट, भाजपाच्या नेत्यांना तोंड देतोय. मला माहित्येय आगामी निवडणुकीत हे सगळे माझ्यावर तुटून पडणार आहेत. पण मी माझ्या मतदारांशी प्रामाणिक आहे. मी आज तत्वासाठी उभा आहे, असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहिले आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आले आहेत. भास्कर जाधवांकडे आज उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून पाहिलं जात आहे. 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेतील फूट, आगामी वाटचाल आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आपली भूमिका मांडली.
"आज उद्धव ठाकरे एकाएकी लढताहेत त्यांची साथ सोडायची नाही या एका धेय्यासाठी उभा आहे. उद्या निवडणुकीत माझी हार होईल की जीत होईल तो सर्वतोपरी निर्णय मी माझ्या मतदारांवर सोडला आहे. मला हरवणं सोपं नाही हेही मला माहित आहे. पण ही सगळी सत्ताधारी मंडळी आहेत. ताकदवान मंडळी आहेत. मी विरोधात आहे. लोकांना वाटतं भास्कर जाधव हजारो कोटींचा मालक आहे. पण मी काय आहे ते माझं मला माहित आहे. मी माझ्या मतदारांशी प्रमाणिक आहे", असं भास्कर जाधव म्हणाले.
मंत्रिमंडळात मला घेतलं नाही, पण...
"उद्धव ठाकरेंनी मी सर्वात सीनिअर असून सुद्धा मला मागच्या मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळे खरंतर मी हातचं राखून राहिलं पाहिजे होतं. पण आज माझ्या डोक्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. जे घडलंय ते चुकीचं घडलंय. भाजपानं सगळे पक्ष संपवण्याचा घाट सुरू केला आहे. २०१९ ला स्वत:हून तुम्ही 'मातोश्री'वर जाता आणि युती करुन घेता. लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणता आणि विधानसभेत शिवसेनेच्या ७० जागा तुम्ही पाडता. मी पुढच्या निवडणुकीत लढेन की नाही तेही मला माहित नाही. पण आज मी सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोवर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी मला कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल", असं भास्कर जाधव म्हणाले.
मला कोणताही मोह नाही, कदाचित...
"मला कोणत्याही पदाची किंवा आमदारकीचा मोह नाही. उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय हा माझा निर्णय आहे. त्याचा दोष मी कुणालाच देणार नाही. पुढच्या निवडणुकीत सगळे माझ्या विरोधात उतरणार आहेत. कदाचित मला २०२४ सालच्या निवडणुकीत तिकीटही मिळणार नाही. मला कोणतीही अपेक्षा नाही. कोणत्याही पदाची लालसा किंवा मोह नाही. तरीसुद्धा या सर्वांना पाणी पाजल्याशिवाय मी राहणार नाही", असं भास्कर जाधव म्हणाले.