Join us

सुरक्षा अभियानानंंतरही एसटीच्या अपघातांचा आलेख चढताच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:13 AM

प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांच्या तांत्रिक देखभालीसाठी ११ जानेवारीपासून अभियान राबविण्यात येणार आहे.

मुंबई : एसटीचालकांमध्ये सुरक्षेबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांच्या तांत्रिक देखभालीसाठी ११ जानेवारीपासून अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दरवर्षी राबविण्यात येत असले तरीही अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ३७८ अपघात जास्त झाले आहेत.२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये दर लाख किमीमागे अपघाताचे प्रमाण ०.२ टक्के जास्त आहे. तसेच अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारीही जास्त आहे. २०१६-१७ मध्ये या कालावधीत एसटीच्या दर लाख किमीमागे होणाºया अपघातांचे प्रमाण ०.१३ टक्के होते. हे प्रमाण २०१७-१८ मध्ये ०.१४ टक्के झाले. तर, २०१८-१९ मध्ये ०.१६ टक्के झाले आहे. २०१७-१८ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये अपघातांची संख्या ३७८ ने वाढली आहे. २०१७-१८ मध्ये अपघातांची संख्या २,९३२ होती. तर, २०१८-१९ मध्ये अपघातांची संख्या ३,३१० झाली. २०१७-१८ मध्ये अपघातांत मृत्यूची संख्या ४२४ होती. तर, २०१८-१९ मध्ये ती ४४१ झाली.राज्यातील अपघातांच्या तुलनेत एसटी अपघातांचे दर लाख किमीचे प्रमाण कमी आहे. एसटीच्या अपघातांत ९० टक्के अपघात इतरांच्या चुकामुळे होते. तरीही, एसटीच्या चालकांना प्रशिक्षण दिले जाते. मानसिक प्रबोधन, मानसिक स्वास्थ्य यांचे मार्गदर्शन केले जाते. एसटी चालकांद्वारे सुरक्षित प्रवास करण्यामागचा उद्देश आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.