Join us

नोटीस पाठवूनही बिल्डर एसआरएला जुमानेनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 9:26 AM

१५० झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत किती झोपडीधारकांचे भाडे थकविले? याची माहिती एसआरएला देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहेत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या १५० झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत किती झोपडीधारकांचे भाडे थकविले? याची माहिती एसआरएला देण्यास बिल्डर टाळाटाळ करत आहेत. १५० योजनांतील केवळ २६ बिल्डरांनीच भाडेविषयक माहिती एसआरएकडे सादर केली आहे. त्यामुळे उर्वरित १२४ बिल्डरांना एसआरएने नोटीस पाठवली आहे.

एसआरएमार्फत झोपडीधारकांना पक्की घरे मिळावीत यासाठी पुनर्वसन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत इमारत बांधली जात असताना पात्र झोपडीधारकांना बिल्डरकडून झोपडी पाडल्यानंतर भाडे देणे बंधनकारक असते. मात्र अनेक बिल्डर झोपडीधारकांना भाडे देत नसल्याच्या तक्रारी एसआरएकडे येत आहेत. यावर कारवाई करण्यात येत असून आढाव्यानुसार १५० योजनांतील बिल्डरांनी झोपडीधारकांचे भाडे थकविल्याचे समोर आले आहे. 

वसुलीसाठी काय?

  भाडे वसूल करण्यासाठी २५ नोडल ऑफिसर नेमले आहेत. या व्यतिरिक्त बिल्डरने नवीन योजना हाती घेताना २ वर्षांचे भाडे डीडीने तर त्या पुढील एका वर्षाचे भाडे चेकने एसआरएकडे जमा करणे बंधनकारक आहे.  १५० पैकी १० योजनांत ईडीकडून बिल्डरवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे या १० योजना स्थगित झाल्या आहेत.

काय कारवाई ?

 विकल्या जाणाऱ्या घरांच्या बांधकामावर स्थगिती येणार. बिल्डरला कोणतीही नवी योजना जाहीर करता येणार नाही. बिल्डरला थकबाकीदार म्हणून जाहीर केले जाईल.

पश्चिम उपनगर : ८५ योजना आहेत. बिल्डरने ६६० कोटी १२ लाख २१ हजार ८८६ रुपये भाडे थकविले होते. त्यापैकी १५१ कोटी २४ लाख ४३ हजार ६८७ रुपये भाडे दिले आहेत. 

पूर्व उपनगर : ४९ योजना आहेत. १८५ कोटी ९० लाख ८ हजार ६२८ रुपये भाडे थकविले होते. २२ कोटी २९ लाख ३० हजार ८०० रुपये भाडे दिले आहे.

मुंबई शहर : १६ योजना आहेत. १०२ कोटी ३ लाख २२ हजार ३९० रुपये भाडे थकविले होते. ३३ कोटी ५५ लाख २५ हजार ३०० रुपये भाडे दिले आहेत.

एकूण : १५० योजना आहेत. ९४८ कोटी ६ लाख ५२ हजार ८९४ रुपये भाडे थकले. यापैकी २०७ कोटी ८ लाख ९९ हजार ७८७ रुपये भाडे बिल्डरने भरले. आता ७४० कोटी ९७ लाख ५३ हजार १०७ रुपये भाडे थकले आहे.

एच/वेस्टमध्ये ४ योजना. के/ईस्टमध्ये २० योजना. के/वेस्टमध्ये १० योजना. पी/एसमध्ये ८ योजना.पी/नॉर्थमध्ये ८ योजना.आर/साऊथमध्ये ८ योजना. आर/नार्थमध्ये १ योजना.आर/मध्यमध्ये ११ योजना. एसमध्ये ७ योजना.टीमध्ये १२ योजना. एनमध्ये ९ योजना.एलमध्ये ८ योजना.एम/ईस्टमध्ये ३ योजना.एम/वेस्टमध्ये १० योजना. एफ/साऊथमध्ये ४ योजना.एफ/नॉर्थमध्ये ९ योजना. जी/साऊथमध्ये ७ योजना आहेत .

टॅग्स :मुंबई