लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप तावडे (४९) यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असतानाही कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दहिसर पोलीस ठाण्यात न्यायालयीन कामकाज पाहणारे तावडे यांनी १२ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला होता. तर महिनाभरानंतर १३ मार्च रोजी लसीचा दुसरा डोस घेतला. पण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही जवळपास महिनाभराने म्हणजे २१ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
त्यांना २१ एप्रिलला दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना २४ एप्रिलला सेव्हन हिल्स रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याने २६ एप्रिलला त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. मात्र पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी पुन्हा अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिराने त्यांचे निधन झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, नागरिकांनी लसीचे डोस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
.......................................