जलसाठा असतानाही ‘टंचाई’ का ? नगरसेवकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:19 AM2018-04-08T04:19:04+5:302018-04-08T04:19:04+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मुबलक जलसाठा आहे. तरीही उन्हाळ्याला सुरुवात होताच मुंबईतील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मुबलक जलसाठा आहे. तरीही उन्हाळ्याला सुरुवात होताच मुंबईतील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या कामाचा फटका जलवाहिन्यांना बसून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचा नाहक भुर्दंड मुंबईकरांना भरावा लागत असल्याची तक्रार स्थायी समिती सदस्यांनी शनिवारी केली.
शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे याकडे लक्ष वेधले. अघोषित पाणीकपातीमुळे नागरिक त्रस्त आहेत. स्थानिक रहिवाशांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागतो, अशी तक्रार भाजपाचे विद्यार्थी सिंह यांनी केली. तर मेट्रो कंपनीच्या खोदकामाचा जलवाहिन्यांना फटका बसून लाखो लीटर पाणी वाया जात आहे, या गंभीर मुद्द्याकडे शिवसेनेचे सदानंद परब यांनी लक्ष वेधले.
आग्रीपाडा येथे मेट्रो रेल्वेसाठी ड्रिलिंगचे काम सुरू असताना जलवाहिनीला ड्रिलचा धक्का बसला. मात्र, ठेकेदाराच्या कामगारांनी याबाबत सूचित न करता घटनास्थळावरून पळ काढला, असे परब यांनी निदर्शनास आणले.
सहा महिन्यांत असा प्रकार दोनवेळा झाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याची गंभीर दखल घेत हा मुद्दा राखून ठेवला.
दूषित पाण्यासह गळतीवर उपाय शोधणार
मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असून, दूषित पाणी येण्याचेही प्रमाण मोठे आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मुंंबई महापालिका सरसावली असून, कुर्ला येथील ‘एल’ वॉर्डमधील पाणीगळतीसह दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. येथे मुंबई महापालिकेकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
-कुर्ला येथील ‘एल’ वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत; शिवाय चाळींसह इमारतींची संख्याही मोठी आहे. येथील झोपड्यांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथे नवी जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिका काम हाती घेणार आहे. १०० ते ३०० मिलीमीटरपर्यंतच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि नव्या जलवाहिन्या बसविणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, याकामी पालिका
५ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. जलवाहिन्यांच्या कामांतर्गत छेद जोडण्या करणे, झडपा बसवणे, झडपांचे चेंबर्स बांधणे व दुरुस्ती करणे, अत्यावश्यक असलेले नळखांब बसवणे, दुरुस्ती करणे ही कामे केली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे भविष्यकाळात येथे दूषित पाण्यासह
पाण्याच्या गळतीची समस्या भेडसावू नये म्हणून ही कामे
हाती घेण्यात येणार आहेत.
जलगळती आणि दूषित पाणीपुरवठा ही समस्या केवळ कुर्ल्यात नाही, तर संपूर्ण मुंबईत आहे. डोंगर उतारावर राहत असलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ठिकठिकाणी पाण्याच्या वेळा मध्यरात्री असल्याने रहिवाशांची झोप उडत आहे. पूर्व उपनगरात गोवंडी, मानखुर्द येथे पाण्याची मोठी किल्लत असून, पालिकेला याकडे कानाडोळा करत आहे.
‘पाण्याचे असमान वाटप’ या मुद्द्यावर पाणी हक्क समितीने टीका करूनही ‘श्रीमंत’ पालिकेला येथील पाण्याचा प्रश्न पूर्णत: सोडवता आलेला नाही.