मुंबई पालिका निवडणुकीत उमेदवारांचे एका मतानेही बदलणार नशीब
By admin | Published: February 8, 2017 10:13 PM2017-02-08T22:13:26+5:302017-02-08T22:13:48+5:30
मुंबई महापालिका 2017 च्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - शिवसेना आणि भाजपामध्ये 25 वर्षांनंतर झालेला काडीमोड व काँग्रेस -राष्ट्रवादीत बिघडलेले सूर यामुळे मुंबई महापालिका 2017 च्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. यात मनसेही पूर्ण ताकदीनिशी उतरल्याने जवळपास सर्वत प्रभागात पंचरंगी लढत होणार आहे. यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात असल्याने निसटता विजय तर चुटपूट लावणारे पराभव यंदाच्या निवडणुकीत पाहिला मिळणार आहेत.
2007मध्ये 28 उमेदवार 300 ते 500 इतक्या कमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते. हेच प्रमाण 2012 मध्ये 35 वर पोहोचले. मात्र यावेळेस शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, मनसे, एमआयएम असे सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्यात बंडखोरांचे आव्हान यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. गेली 21 वर्ष एकत्र असलेल्या शिवसेना- भाजपामध्ये जागांची विभागणी होत असे. तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे युती विरुद्ध आघाडी असे चित्र होते. मात्र 2017 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटत आरपारच्या लढाईची तयारी केली आहे. त्यामुळे विजय मिळवणे सर्वच मोठ्या पक्षांना जड जाणार आहे. परिणामी सर्वच प्रभागात चुरस निर्माण होणार आहे.
असे आहेत निसटते विजय
-2012 मध्ये किमान 300 ते पाचशेहून कमी फरकाने जिंकलेल्या जागा ३५ होत्या. यामध्ये शिवसेना सात, भाजपा तीन, काँग्रेस 11 मनसे पाच, राष्ट्रवादी एक ठिकाणी विजयी झाली होती,
- 2007 मध्ये अशा निसटता विजयाचे प्रमाण 28 होते. यात शिवसेना सात, भाजपा चार, कॉंग्रेस सहा, मनसे तीन व राष्ट्रवादी चार ठिकाणी विजयी झाले होते.
प्रभाग पक्ष एकूण मतदान मतांचा फरक, शिवसेना उमेदवार विजयी
4... मनसे 8428- 319
39 काँग्रेस 6123- 469
89 राष्ट्रवादी 5427 - 411
149 कॉंग्रेस 5068 - 436
169 काँग्रेस 5437 -305
170 काँग्रेस 7380- 318
201 काँग्रेस 6816 - 188
भाजप उमेदवार विजयी
63 काँग्रेस 5081- 52
98 काँग्रेस 7980-385
171 राष्ट्रवादी 2123- 180
काँग्रेस उमेदवार विजयी
45 अपक्ष 5755 - 391
55 शिवसेना 5494- 382
65 शिवसेना 5162- 294
77 शिवसेना 5707- 225
140 अपक्ष 4377 - 241
147 शिवसेना 9992 - 287
178-शिवसेना 9246- 68
196 समाजवादी 5854- 339
209 मनसे 6231- 365
225 मनसे 5853- 240
226 मनसे 6548- 20
राष्ट्रवादीचा विजय
मनसे 100- 8810 - 316
मनसे
11 राष्ट्रवादी 7164- 128
116 शिवसेना 3357- 304
182 काँग्रेस 4881 - 207
187 काँग्रेस 5673 - 256
190 शिवसेना 6595- 175
अशी होईल मतांची विभागणी
शिवसेना भाजपा 21 वर्षे एकत्र होते. त्यामुळे शिवसेनेचे मराठी मतं भाजपाच्या उमेदवाराला तर त्यांची गुजराती मतं शिवसेनेला मिळत होती. मात्र भाजपाने सर्वाधिक मराठी उमेदवार रिंगणात उतरवून मराठी कार्ड वापरले आहे. तर शिवसेनेनेही गुजराती उमेदवार उभे केले आहेत. तसेच मराठी मतांवर मनसेनेही दावा केला आहे. दुसरीकडे 2012 मध्ये आघाडी करीत 65 जागांवर विजय मिळवणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र यातही काँग्रेसच्या पारंपरिक अल्पसंख्याक मतांमध्ये एमआयएममुळे विभाजन होणार आहे.