मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेकडून स्थानकांवरही स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून प्लॅस्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात टाकून अस्वच्छता पसरविली जाते. ही बाब निदर्शनास आल्याने प्लॅस्टिकच्या बाटल्या नष्ट करता येतील अशा मशिन स्थानकांवर बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यातील एक मशिन चर्चगेट स्थानकात बसवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एक बाटली प्रवाशांनी नष्ट केल्यास त्यांना १० टक्के सवलत असणारे कुपन मिळणार आहे. या कुपनमुळे शॉपिंग आणि अन्य पेयांवर सवलत मिळवता येणे शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या रेल्वे रुळांवर, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांकडून फेकण्यात येतात. त्यामुळे अस्वच्छता तर होतेच; शिवाय पावसाळ्यात पाणी साचण्यास प्लॅस्टिकच्या बाटल्याही कारणीभूत ठरतात. यातून मार्ग काढण्यासाठी प्लॅस्टिक बाटल्या नष्ट करता येतील आणि त्यांचा दुसऱ्या कामांसाठी वापर करता येईल, अशा मशिन स्थानकांवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून सध्या चर्चगेट स्थानकात एक मशिन ७ जून रोजी बसवण्यात आली. प्रवाशांनी स्वत:हून पुढाकार घेऊन या मशिनमध्ये प्लॅस्टिक बाटल्या टाकाव्यात यासाठी नामी शक्कल लढवली. एक बाटली प्रवाशांनी या मशिनमध्ये टाकून नष्ट केल्यास त्यांना १० टक्के सवलतीचे कुपन देण्यात येईल. खाद्यपदार्थ, शॉपिंग, थंड पेय, चित्रपटाचे तिकीट, मोबाइल रिचार्ज इत्यादीवर ही सवलत मिळेल. सध्या चर्चगेट स्थानकात एका खाजगी कंपनीमार्फत ही मशिन बसविण्यात आली असून, प्रवाशांना कुपनचे वाटप केले जात आहे. मात्र त्या कुपनमधून मिळणारी सवलतीची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार आहे. चर्चगेटमध्ये आणखी एक मशिन बसवतानाच मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, भार्इंदर येथे प्रत्येकी दोन मशिन बसविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
प्लॅस्टिक बाटली नष्ट करा, सवलत मिळवा
By admin | Published: June 24, 2016 4:03 AM