विकासाकडून विनाशाकडे...!

By admin | Published: March 23, 2015 02:09 AM2015-03-23T02:09:54+5:302015-03-23T02:09:54+5:30

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाचा अनुभव घेतला. सोशल मीडियावर पावसाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र त्यामागील भयानकता अद्याप सर्वसामान्यांपासून तरुणाईच्या ध्यानात आलेली नाही.

Destruction from development ...! | विकासाकडून विनाशाकडे...!

विकासाकडून विनाशाकडे...!

Next

सचिन लुंगसे ल्ल मुंबई
गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाचा अनुभव घेतला. सोशल मीडियावर पावसाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र त्यामागील भयानकता अद्याप सर्वसामान्यांपासून तरुणाईच्या ध्यानात आलेली नाही. तापमानवाढीचा हा परिणाम भावी पिढीला किती धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव अद्याप झालेली नाही. जागतिक हवामान दिनानिमित्त हवामानातील बदलाचा घेतलेला हा आढावा.
मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे आर्द्र आणि शुष्क असे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू दिसतात. मार्च ते आॅक्टोबरदरम्यान हवामान आर्द्र असते. या वेळी तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असून तापमान ३० अंश सेल्सियसपर्यंत जाते. जून ते सप्टेंबरपर्यंत मुंबईला मान्सूनचा पाऊस झोडपतो. मुंबईचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील मान्सून बदलेला दिसतो.
मुंबईतील विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते. तर एका दिवसात सर्वात जास्त म्हणजेच ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतक्या पावसाची नोंद २६ जुलै, २००५ रोजी नोंदवण्यात आली आहे. मात्र ही तफावत पुढील काही वर्षांत सातत्याने बदलताना दिसेल. कारण पर्यावरणीय बदलांचा परिणाम हा नेहमीच हवामान बदलात होत असतो. भविष्यात मुंबईच्या विकासकामांसाठी पर्यावरणीय क्षेत्रात होणारे बदल त्यात अधिक कारणीभूत ठरतील. कारण कागदावर मुंबईच्या विकासाचे आराखडे आखले जातात. त्याप्रमाणे विकासही होतो. मात्र आराखड्यात पर्यावरणाची जी हानी दाखवली जाते़ त्याची भरपाई मात्र कुठेच होताना दिसत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याचा पाठपुरावा करण्याची सक्षम यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मुंबईत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. कारण या वेळी उत्तरेकडून वाहणारे थंड वारे वातावरणात बदल निर्माण करतात. दरम्यान, इथले वार्षिक तापमान कमाल ३८ अंश सेल्सिअस ते किमान ११ अंश सेल्सियस इतके असते. आतापर्यंत मुंबईतले विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३ अंश सेल्सिअस व किमान ७.४ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले आहे. मात्र २१व्या शतकाच्या मध्यापर्यंत कमाल तापमानात वाढ, तर किमान तापमानात घट होण्याची भीती व्यक्त करत आहेत.
आतातरी सजग व्हा!
एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदात तज्ज्ञ व्यक्त करतात. तापमानात वाढ झाल्याने हिमवृष्टीचे प्रमाण कमी होईल, पुरांची संख्या व तीव्रता वाढेल, उन्हाळ्यात वादळे होतील, सागरपातळी दर वर्षी वीस ते तीस मिलीमीटरने वाढेल, किनारी प्रदेशातील भूजल अधिक खारट होईल, असे परिणामही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या गोष्टींमुळे हवामान बदल होतोय. इंधनाचा वापर ही शहरी भागातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे जागतिक हवामान संघटनांमार्फत हवामानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना प्रशासनातील निर्णय घेणाऱ्या व्यक्तींची सांगड घालून दिली जात आहे, जेणेकरून हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर उपाययोजना राबवता येतील, असे हवामान केंद्राचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

अशा ठेवतात नोंदी : रडार रेडिओ लहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा, पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉप्लर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची
नोंद करता येते. समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात. फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वी प्रदक्षिणा करणारे काही कृत्रीम उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात.

गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यवृष्टीत बदल जाणवू लागले आहेत. जूनमधे पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात कुठे थोडी वाढ, तर काही ठिकाणी घट होते. जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी घट झालेलीही दिसते. हवामान बदलाचा सगळ्यात मोठा व नेमका निर्देशक म्हणजे येथील मान्सूनच्या वृत्तीत होणारे बदल आहे. कार्बन डायआॅक्साइडचे उत्सर्जन हे एकमेव कारण हवामान बदलामागे असल्याचेही पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

हस्तेक्षप नकोच
वातावरणाची प्रत बदलून टाकणाऱ्या मानवी हस्तक्षेपाचा तो एक अटळ परिणाम आहे. कोळसा व खनिज तेलाचा अतिरिक्त वापर, नागरीकरण, स्थानिक पातळीवर होणारी उष्णता वृद्धी, हवेचे प्रदूषण, वाढणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण, उष्णता विकिरण आणि शोषण यांत प्रदूषणामुळे होणारे बदल, ढगांच्या निर्मिती प्रक्रियेत येणारे अडथळे या सर्वच गोष्टींमुळे सध्याचे हवामान दिवसेंदिवस जास्तच वेगाने बदलू लागले आहे.

हवामानशास्त्र म्हणजे ?
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोडींचे निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार निकटचा आणि भविष्यातील अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते.

 

Web Title: Destruction from development ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.