Join us

पदवी प्रमाणपत्रावरील तपशील तपासता येणार, विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 9:18 AM

University Education: मुंबई विद्यापीठाचा २०२२ चा दीक्षान्त समारंभ २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२२ चा दीक्षान्त समारंभ २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी सत्र २०२२ मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी ) नाव अचूक यावे म्हणून नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विद्यापीठाने घेतलेल्या २०२२च्या प्रथम तसेच द्वितीय सत्रामधील पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच जे विद्यार्थी दीक्षान्त समारंभापूर्वी म्हणजे २३ फेब्रुवारीपूर्वी पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तेही पदवी घेण्यास पात्र राहणार आहेत. पदवी, पदव्युत्तर व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येतील आणि त्याचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करण्यात येणार आहे. 

मात्र, त्याआधी सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी  (देवनागरी) नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे. 

लेखी तक्रारीला वावमहाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक दिली आहे. महाविद्यालयास प्रमाणपत्र शोधण्यास व वितरित करण्यास सोयीचे होणार आहे. याशिवाय पदवी, पदव्युत्तर व पदविका प्रमाणपत्रे न मिळाल्यास अथवा या प्रमाणपत्रात काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत लेखी तक्रार दीक्षान्त समारंभाच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत परीक्षा विभागाच्या चौकशी कक्षात छत्रपती शिवाजी महाराज भवन, विद्यानगरी येथे करावी, असे आवाहन परीक्षा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

टॅग्स :शिक्षणविद्यार्थी