जमीर काझी मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक कामटे हे ११ वर्षांपूर्वी शहीद झाले असले तरी केंद्रीय व राज्यातील गृह विभागाच्या मते ते सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. सरकारने त्यांना २०१८ या आर्थिक वर्षातील त्यांच्या मालमत्तेची माहिती कळविण्याची सूचना केली आहे. इतकेच नव्हे तर दिवंगत वरिष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय, आर. के. सहाय हेदेखील त्यांच्या लेखी अद्याप पोलीस दलात कार्यरत असून त्यांनाही आपल्या स्थावर मालमत्तेच्या परताव्याची (आयपीआर) माहिती कळविण्यास सांगण्यात आले आहे.
केंद्रीय गृह विभागाने २०१८ च्या आर्थिक वर्षातील ‘आयपीआर’ न भरलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारला पाठविली आहे. त्यामध्ये उपरोक्त अधिकाºयांसह निवृत्त आणि खात्यातून कमी करण्यात आलेल्या काही अधिकाºयांचा समावेश आहे. केंद्राने कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकाºयांची यादी अद्ययावत केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारनेही त्यांना त्याबाबत काहीही कळविलेले नाही.
केंद्रीय सेवेतील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना दरवर्षी आपल्या मालमत्तेबाबत (आयपीआर) माहिती देणे अनिवार्य आहे. २०१८ या वर्षात राज्य पोलीस दलातील १४ अधिकाऱ्यांनी माहिती पाठविली नसल्याचे राज्याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कळविले आहे. त्यामध्ये तिघा अधिकाºयांसह दोघा निवृत्त आणि प्रशासकीय कारणास्तव सेवेतून काढलेल्या अधिकाºयांचा समावेश आहे. राज्य सरकारने व गृह विभागाने त्याची शहानिशा न करता पोलीस महासंचालक कार्यालयाकडे कार्यवाही करण्यासाठी पाठिवली आहे. विशेष महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आलेल्या यादीची शहानिशा न करता संबंधितांना माहिती पुरविण्याची सूचना केली आहे.
यादीमध्ये २६/११ च्या हल्ल्यातील शहीद अशोक कामटे, सुमारे ६ वर्षांपूर्वी घरातील आगीत मृत झालेले आर. के. सहाय, आत्महत्या केलेले हिमांशू रॉय, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, दिवंगत आनंद मंड्या, बडतर्फ अधिकारी विजय कृष्ण यादव, अनियमितपणे गैरहजर राहिल्याने कमी करण्यात आलेले मारिया फर्नांडिस, निवृत्त भगवंत मोरे यांचा समावेश आहे. या यादीत सध्या कार्यरत असलेल्यांपैकी दिलबर सिंग भारती, अजयकुमार बन्सल, पी.एन मगर, अंकित गोयल, हिरानी मोहनकुमार या अधिकाºयांचा समावेश आहे.शहीद, मृत आणि निवृत्त झालेल्या आधिकाºयांची नावे आयपीआर न भरण्याच्या यादीत समाविष्ट असणे, ही दुर्दैवी आणि संबंधितांच्या कुटुंबीयांना वेदना देणारी बाब आहे. संबंधित अधिकारी गंभीर बाबींकडे किती दुर्लक्ष करतात, हे दिसून येते. - डॉ. माधवराव सानप,निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक