नवी मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या अशोककुमार नगरिया (४९) या आरोपीवर वाशी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या चौकशीत अशाच प्रकारचे देशात ३०० हून अधिक तर मुंबई, नवी मुंबईत २० ते २५ तोतये अधिकारी वावरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.वाशीतील इनॉर्बिट मॉललगत एक कार उभी असून त्यावर ‘अॅन्टी करप्शन ब्युरो, उपायुक्त’ अशी पाटी लावलेली असल्याची माहिती उपायुक्त शहाजी उमाप यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार वाशी पोलिसांनी या ठिकाणी जाऊन केलेल्या कारमधील इसमाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. कोणत्याही शासकीय विभागाशी संबंध नसतानाही तो शासनाच्या विभागाच्या नावाचा वापर करून वावरत होता. चौकशीत त्याच्याकडे दिल्लीच्या एका संस्थेचे ओळखपत्र आढळले आहे. ही संस्था अॅन्टी करप्शन ब्युरो (आर) या नावाने चालवली जात आहे. त्यांच्याकडून २० ते ३० हजार रुपयांत अनेकांना उपायुक्त पदाच्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. मात्र शासनाच्या विभागाच्या नावाचा वापर करून त्यांच्याकडून टोलनाक्यावर सूट मिळवली जात होती. शिवाय इतरही गैरप्रकारांमध्ये त्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. यानुसार त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.आरोपी हा एपीएमसी मार्केटमधील व्यापारी आहे. प्रतिष्ठेची वागणूक मिळावी व टोलनाक्यावर सूट मिळावी, यासाठी त्याने स्वत:कडील वाहनावर या पदाचा उल्लेख केला होता. (प्रतिनिधी)
तोतया एसीबी उपायुक्ताला अटक
By admin | Published: December 27, 2015 2:27 AM