बनावट नंबर प्लेट प्रकरणी टुरिस्ट चालकाला अटक
By admin | Published: October 11, 2015 04:12 AM2015-10-11T04:12:25+5:302015-10-11T04:12:25+5:30
कर वाचवण्यासाठी आरटीओमध्ये गाड्यांची नोंदणी न करताच त्यावर बनावट नंबर प्लेट लावून त्या वापरणाऱ्या एका टुरिस्ट चालकाला गुन्हे शाखेने अटक केली.
मुंबई : कर वाचवण्यासाठी आरटीओमध्ये गाड्यांची नोंदणी न करताच त्यावर बनावट नंबर प्लेट लावून त्या वापरणाऱ्या एका टुरिस्ट चालकाला गुन्हे शाखेने अटक केली. राजू सिंह (४०) असे त्याचे नाव असून पोलिसांनी १४ गाड्या जप्त केल्या आहेत. यात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात राहणाऱ्या राजू सिंह याचा गेल्या अनेक वर्षांपासून वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्याने वर्षभरापूर्वी केंद्र शासनाच्या
योजनेमधून काही गाड्या कर्जाने घेतल्या होत्या. गाड्या घेतल्यानंतर त्याने गाड्यांची आरटीओमध्ये नोंदणीच केली नाही.
आरटीओत गाडीची नोंदणी केल्यानंतर नोंदणी फी आणि अनेक कर भरावे लागतात. हे कर वाचवण्यासाठी त्याने या गाड्यांना बनावट नंबर प्लेट लावले. तसेच नोंदणीचे बनावट पेपरही तयार केले होते. गुन्हे शाखा युनिट ७च्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी याबाबत खात्री करून घेतल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अशा प्रकारे बनावट नंबर प्लेट वापरलेल्या १४ तवेरा कार जप्त केल्या आहेत.