Join us

तोतया पत्रकाराची पालिका डॉक्टरला मारहाण

By admin | Published: November 22, 2014 1:17 AM

वाशी येथील पालिका रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी मारहाण करणा-याला अटक केली आहे

नवी मुंबई : वाशी येथील पालिका रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी मारहाण करणा-याला अटक केली आहे. स्वत: पत्रकार असल्याचे सांगत ही व्यक्ती गेली दोन दिवस रुग्णालय व्यवस्थापनाला धमकावत होती.राजेश जयस्वाल (३६) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घणसोली गाव येथे राहणाऱ्या राजेश याची आई कुट्टीदेवी ह्या दोन दिवसांपासून वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता राजेश आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. यावेळी तेथे असलेल्या परिचारिकांना शिवीगाळ करत त्याने आपल्या आईकडे उपचारात दुर्लक्ष होत असल्याचा जाब विचारला. यावेळी तेथे उपस्थित असलेले डॉक्टर शरिफ तडवी यांनी आपण स्वत: रात्री कुट्टीदेवी यांची पाहणी केल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही राजेश याने डॉ. तडवी यांच्यासोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. शिवाय मी पत्रकार आहे, तुम्हाला नोकरीवरून काढू शकतो, असेही धमकावले. डॉ. तडवी यांना मारहाण होत असल्याचा रुग्णालयातील इतर कामगारांनी राजेश याला जाब विचारला. परंतु यावेळी राजेश याने त्यांच्यासोबतही वाद घातला. अखेर सर्वांनी राजेश जयस्वाल याला पकडून वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर कार्यरत डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व कामगारांनी काही वेळ काम बंद केले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने कामगारांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉ तडवी यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध व्यक्त करत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय पत्तीवार, डॉ प्रशांत जवादे व रुग्णालयातील इतर कामगारांनीही पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु डॉक्टरांनीच राजेश याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे बहुजन समाज पक्षाचे भीमराव माने यांचे म्हणणे आहे. तर राजेश हा पक्षाचा कार्यकर्ता असल्याचेही ते म्हणाले. त्यानुसार पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले, शिवाय त्यांनी डॉक्टरांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. राजेश जयस्वालला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)