‘फास्टॅग’ असूनही खोळंबा, दुप्पट टोलवसुलीचाही भुर्दंड; रांगाच रांगा लागल्याने वाहनचालक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:48 AM2021-02-22T01:48:01+5:302021-02-22T07:00:20+5:30
रांगाच रांगा लागल्याने वाहनचालक हैराण
मुंबई/पुणे : प्रत्येक वाहनाला फास्टॅगची सक्ती केल्यानंतरही विविध अडचणींमुळे राज्यात वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई आणि पुण्याच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई, ठाण्याच्या सीमेवरील मुलुंड टोलनाका येथे सकाळी आणि सायंकाळी ऐन कामावर जाण्याच्या आणि घरी परतण्याच्या वेळांमध्ये नोकरदार वर्गाला अजूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर शनिवार आणि रविवारी पुण्याजवळील उर्से टोल नाक्यावर फास्टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कवी संदीप खरे यांनीही मांडली व्यथा
कवी आणि गीतकार संदीप खरे यांनीही फास्टॅगबाबत आलेल्या कटू अनुभवाबद्दलच्या भावना सोशल मीडियावर मांडल्या. पुणे कोल्हापूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर त्यांच्या गाडीवरील फास्टॅग स्कॅन न झाल्याने त्यांना १० मिनिटे थांबविण्यात आले होते. फास्टॅग असल्याने दंड न भरण्याची भूमिका खरे यांनी घेतली होती. कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विदर्भात अजब प्रकार
विदर्भातील एका टोल नाक्यावर तर कर्मचाऱ्यांकडून विशिष्ट बँकेच्या माध्यमातूनच फास्टॅग कार्ड बनविण्यावर जोर देण्यात येत होता. हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते.