मुंबई : बनावट नोटांद्वारे बाजारात कांदे-बटाटे खरेदी करणाऱ्या एका तस्कराला दोन वर्षांपूर्वी टिळक नगर पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीविरोधात पोलिसांनी सबळ पुरावे सादर केल्याने न्यायालयाने त्याला १५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.मोहम्मद मुस्तफा शेख (३४) असे या आरोपीचे नाव असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या आरोपीने एका भाजी विक्रेत्याकडून ८० रुपयांचे कांदे-बटाटे खरेदी करत त्याला एक हजाराची बनावट नोट दिली. भाजी विक्रेत्याला संशय आल्याने त्याने या आरोपीला हटकले असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच वेळी या ठिकाणी टिळक नगर पोलीस ठाण्याचे काही पोलीस गस्त घालत होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून या आरोपीला पकडले. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याजवळ एक हजार रुपयांच्या २१ नोटा बनावट आढळल्या. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.पोलीस उपनिरीक्षक विजय अहिरे आणि हवालदार विजय खराडे यांनी आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा केले. शिवाय पोलिसांनी अनेक साक्षीदारांना न्यायालयात हजर केल्यानंतर या आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने या आरोपीला १५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
बनावट नोटांची तस्करी करणाऱ्याला कारावास
By admin | Published: December 25, 2015 2:45 AM