Join us

डेंगी रोखण्याचा पालिकेचा निर्धार

By admin | Published: November 07, 2014 1:26 AM

मुंबई शहर आणि उपनगरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढतच जात असून, संपूर्ण मुंबई डेंगीच्या कचाट्यात सापडली आहे. यावर उपाय म्हणून महानगरपालिका आता सरसावली

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढतच जात असून, संपूर्ण मुंबई डेंगीच्या कचाट्यात सापडली आहे. यावर उपाय म्हणून महानगरपालिका आता सरसावली असून, शाळा, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बसथांबे, मॉल्स, धार्मिक ठिकाणे इत्यादी गर्दीच्या ठिकाणी याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महापालिकेने यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली असून उपाययोजनांनाही गती देण्यात आली आहे. पालिका सार्वजनिक स्वच्छतेची कामे करीत असली तरी नागरिकांनीही आपापल्या घर आणि परिसरात स्वच्छता कायम राखली जाईल, याची दक्षता घेतली पाहिजे. घरोघरी जाऊन डेंगीच्या अळ्या आहेत किंवा कसे, याची तपासणी सुरू असून आतापर्यंत ९ लाख ठिकाणी भेटी देऊन तपासणी करण्यात आली आहे. जेथे अशा अळ्या/डास आढळल्या, तेथे कार्यवाही करण्यात येत आहे. २०१० मध्ये मुंबईत हिवताप (मलेरिया) या आजाराचा प्रादुर्भाव वाढला होता, त्या वेळी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. लोकांच्या सहभागातून आजारांना रोखणे शक्य आहे, हे जनतेला पटवून दिले. महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर क्षेत्रीय भेटी दिल्या तसेच उपाययोजनांना गती दिली. त्याच धर्तीवर आता महापालिका या सर्व बाबींचे अनुकरण करणार असून, तसे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांनीदेखील महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य केले पाहिजे. लोकसहभाग असेल तर तत्काळ प्रशासनाच्या योजनांना यश लाभते. कोणत्याही प्रकारचा ताप असेल तर स्वमर्जीने औषधोपचार न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, पुरेसे उपचार करून घ्यावेत. डेंगी हा आजार संसर्गजन्य नाही तर तो डासांपासून फैलावतो, त्यामुळे अफवांना न भिता आपापले घर व परिसर प्रत्येकाने स्वच्छ राखण्याकरिता हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)