फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:01 AM2018-11-01T01:01:35+5:302018-11-01T01:01:50+5:30
जोगेश्वरीतील महाराष्ट्र वैदू विकास समितीतर्फे वैदू समाजाने या वर्षी दिवाळीही फटाकेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : जोगेश्वरीतील महाराष्ट्र वैदू विकास समितीतर्फे वैदू समाजाने या वर्षी दिवाळीहीफटाकेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. फटाक्यांनी पर्यावरणाचे नुकसान होते. फटाके उडविणे म्हणजे आगीशी खेळच असतो. त्यामुळे यंदाची दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय वैदू समाजाने घेतला आहे.
फटाक्यामुळे आग लागणे, भाजणे, मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी होणे या घटना दरवर्षी वाढतच असतात. फटाक्यामुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि जमिनीचे प्रदूषण होत असते. फटाक्याच्या कारखान्यामध्ये बालमजुरांना जुंपले जाते. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या बालमजुरीला प्रोत्साहन दिले जाते. सामाजिक संस्था फटाके फोडण्याविरोधात आवाज उठवित असतात. त्यामुळे यंदा वैदू समाजाने हा परिवर्तनवादी निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र वैदू विकास समितीच्या अध्यक्षा दुर्गा गुडीलू यांनी सांगितले.