कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यास कटिबद्ध
हुतात्मादिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा दिनानिमित्त रविवारी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात केला.
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, तर बेळगाव, कारवार, बीदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
आजच्याच दिवशी १९५६ मध्ये अन्यायकारक पद्धतीने बेळगाव, कारवार, बीदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडण्यात आली. हा अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील. कर्नाटक सीमा भागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही अजित पवार यांनी व्यक्त केला.