Join us

बोरिवलीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम, गोपाळ शेट्टी यांनी विनोद तावडेंकडे मांडली भूमिका

By मनोहर कुंभेजकर | Published: November 01, 2024 5:30 PM

बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - पक्षाने सात वेळा उमेदवारी देवून मला न्याय दिला आहे. मात्र चार वेळा पक्षाने बाहेरचा उमेदवार दिला. यामुळे, हा बोरिवलीकरांवर घोर अन्याय असून त्यांच्या आत्मसन्मानासाठी मी बोरिवलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, असे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना सांगितले आहे.

बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपाचे संकटमोचक विनोद तावडे यांनी काल दुपारी ४ वाजता शेट्टी यांची पोयसर जिमखान्या समोरील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली. मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असून येथून अपक्ष  निवडणूक लढवणार आहोत. यासंदर्भात शेट्टी यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

बोरिवली ही काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही असं लिहिलेले नाही. परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते असे त्यांनी या चर्चेत सांगितले.

गेल्या ३३ वर्षात मी एकही चुकीचं काम केले असेल तर पक्षाने मला सांगावे, मी मरेपर्यंत पक्षाचं मजुराप्रमाणे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कुणाशीही चर्चा केला नाही हे योग्य नाही. वारंवार छळ करणे योग्य नसून ही लढाई मी लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४गोपाळ शेट्टीभाजपाविनोद तावडे