Join us

डिव्हाईन चाईल्ड उपांत्य फेरीत

By admin | Published: October 27, 2015 2:14 AM

अंधेरीच्या डिव्हाईन चाईल्ड आणि बोरीवलीच्या मेरी इमॅक्युलेट यांच्यामधील चुरशीच्या झालेल्या सामन्यात टाय-ब्रेकर पद्धतीने डिव्हाईन चाईल्डने बाजी मारली.

मुंबई : अंधेरीच्या डिव्हाईन चाईल्ड आणि बोरीवलीच्या मेरी इमॅक्युलेट यांच्यामधील चुरशीच्या झालेल्या सामन्यात टाय-ब्रेकर पद्धतीने डिव्हाईन चाईल्डने बाजी मारली. या विजयामुळे डिव्हाईनने डॉन बॉस्को आंतर शालेय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत धडक मारली. मेरी इमॅक्युलेटविरुद्ध डिव्हाईन चाईल्ड संघ पहिल्या क्वार्टरमध्ये २-६ असा पिछाडीवर पडला होता. मात्र यानंतर त्यांनी जबरदस्त झुंज देताना मध्यांतराला ८-८ अशी बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाला आणि सामना १८-१८ असा बरोबरीत सुटला. सामना निकाली काढण्यासाठी घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये डिव्हाईन संघाने निर्णायक खेळ करताना तुफान आक्रमणाच्या जोरावर २२-१८ अशी बाजी मारली. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या डॅनिकाने ८ तर साक्षीने ८ बास्केट करून संघाच्या विजयात मोलाचे योगदाने दिले. पराभूत संघाकडून इशा आणि मेलानी यांनी अपयशी झुंज दिली.तत्पूर्वी याच गटात सामन्यात विद्यानिकेतन संघाने एकहाती वर्चस्व राखलेल्या सामन्यात अ‍ॅपोस्टोलिक कार्मेल संघाचा ३१-० असा सहज चुराडा केला. जबरदस्त आक्रमक खेळ करताना विद्यानिकेतन संघाने अ‍ॅपोस्टोलिक संघाला हतबल केले. त्याचवेळी भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बास्केटच्या जवळपासही फिरकू दिले नाही. रुचा (१०), आर्या (६) आणि वैष्णवी (६) यांनी अ‍ॅपोस्टोलिकचा धुव्वा उडवला.मुलांच्या १३ वर्षांखालील ‘अ’ गटात डॉन बॉस्को ‘अ’ संघाने सेंट जोसेफ (वडाळा) संघाचा २१-११ असा फडशा पाडून उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. याच गटातून सेंट जोसेफनेही आगेकूच करताना बॉम्बे स्कॉटीश संघाचा ३०-६ असा दणदणीत पराभव केला.