मनोहर कुंभेजकर
मुंबई: गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने टाळेबंदी शिथील केल्यानंतर नागरिकांची रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर वाढलेले 20 टक्के अनधिकृत फेरीवाले,सर्रास विना मास्क रस्त्यावर फिरणारे आणि सॊशल डिस्टनसिंग पाळण्यात बेपर्वाई करणारे नागरिक यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पश्चिम उपनगरात तर कोरोनाने कहर केल्याचे चित्र आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या 24 वॉर्ड पैकी के पूर्व,पी उत्तर,आर मध्य या वॉर्डने याआधीच कोरोनाचा आतापर्यंतचा 10000 चा आकडा पार केला होता.लोकमतने याबाबतचे सदर वृत्त सर्वप्रथम लोकमत ऑनलाईन व लोकमत मध्ये प्रसिद्ध केले होते.या तीन वॉर्डला राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी भेटी देऊन त्यांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला होता. आजच्या लोकमतच्या अंकात आणि काल लोकमत ऑन लाईनवर डॉ.दीपक सावंत यांच्या अहवालाच्या निष्कर्षाचे वृत्त सोशल मीडियावर व राजकीय वर्तुळात व्हायरल झाले होते.
तर आता के पश्चिम वॉर्डने सुद्धा 10000 चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असून दुसरीकडे नियम पाळत नसलेल्या नागरिकांना वेसण कसे घालायचे हा मोठा प्रश्न आहे.
विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम या भागांचा समावेश असलेल्या आणि सुमारे 10.50 लाख लोकसंख्या असलेल्या के पश्चिम वॉर्डने कोरोना रुग्णांचा 10000 चा टप्पा नुकताच पार केला आहे.पालिका प्रशासनाने दि,17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारी नुसार के पश्चिम वॉर्डमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 10,475 रुग्ण असून 8134 रुग्ण कोरोना मुक्त झालेअसून सक्रीय रुग्ण 1992 इतके आहेत.तर उपचारा दरम्यान 349 रुग्णांचा मृत्यू झाला.रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 42 दिवसांवर गेला आहे.
के पूर्व वॉर्ड हा विलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडे दहा लाख लोकसंख्येचा वॉर्ड आहे. पालिका प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार के पूर्व वॉर्ड मध्ये दि,10 रोजी एकूण कोरोनाचे 9676 रुग्ण होते,तर दि,17 पर्यंत 10,517 रुग्ण आहेत. या वॉर्ड मध्ये 8,228 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 1715 सक्रीय रुग्ण आहेत.तर आतापर्यंत मुंबईत सर्वात जास्त 574 मृत्यू या वॉर्डमध्ये झाले असून रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 58 दिवसांवर गेला आहे.
मालाड पूर्व व मालाड पश्चिम मिळून सुमारे 10 लाख लोकसंख्येचा पी उत्तर वॉर्ड आहे.या वॉर्डमध्ये दि,10 रोजी 9,724 कोरोना रुग्ण होते,दि,17 रोजी कोरोना रुग्णांची संख्या 10,548 आहे.आतापर्यंत या वॉर्डमध्ये 8,579 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 1,581 सक्रीय रुग्ण आहेत,तर आतापर्यंत या वॉर्डमध्ये 388 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. येथे रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 60 दिवसांवर गेला आहे.
बोरिवली पूर्व व बोरिवली पश्चिम हे विभाग आर मध्य वॉर्डमध्ये येतात.या वॉर्डने सुद्धा कोरोना रुग्णांचा 10000 चा टप्पा पार केला असून दि,17 पर्यंत या वॉर्ड मध्ये 10,927 कोरोना रुग्ण होते.आतापर्यंत या व 8,359 रुग्ण कोरोनामुक्त झाले.तर आता सक्रीय रुग्ण 2,240 असून या वॉर्डमध्ये उपचारा दरम्यान 328 रुग्णांचा मृत्यू झाला.येथे रुग्ण वाढीचा दुपटीचा दर 41 दिवसांवर गेला आहे.
मुंबई मे हमे तो कोई रोखा नही !
आता परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबईत मोठ्या संख्येने रोजगारासाठी येऊ लागले आहेत.मात्र त्यांना क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन करण्याची व्यवस्था आपल्याकडे नसून किंवा ते कोरोना मुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. नाही. मै तो मेरे गाव झारखंड के राची से ऑगस्ट मे फ्लाईट से 2800 रुपया तिकीट खरिदकर छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ पोहचा. सिधा मै वर्सोवा के घर पोहच गया अशी बोलकी प्रतिक्रिया जितू पासवान या प्लंबरने लोकमतला दिली.