जमीर काझी, मुंबईगुन्हेगारीच्या बाबतीत देशात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रात श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षितच असल्याचे समोर आले आहे. गेल्या साडेसात वर्षांत राज्यातील लहान-मोठ्या तब्बल ३ हजारांवर मंदिरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून जवळपास ७ कोटींचा ऐवज पळविला आहे. कार्यक्षम असल्याचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना त्यापैकी जेमतेम ३१ टक्के गुन्ह्यांचा शोध लावता आला आहे. त्यांच्याकडून १ कोटी १४ लाखांचा ऐवज वसूल करण्यात यश आले आहे. देणगीच्या स्वरूपातून मंदिरांमध्येदेखील मोठी रक्कम जमा होत असल्याने चोरट्यांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ केले आहे. त्या ठिकाणची मूर्ती, दानपेटी किंवा देवळातील किमती साहित्य पळवून नेण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावला आहे. बॅँका व बंगले, फ्लॅट फोडण्यापेक्षा मंदिरे त्यांच्यासाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. जानेवारी २००८पासून ते जून २०१५पर्यंत मंदिरातील चोऱ्यांचे ३ हजार ६२ गुन्हे घडले आहेत. त्यातून तब्बल ६ कोटी ९३ लाख २९ हजार ९६० रुपयांचा ऐवज पळविला गेला आहे. पोलिसांना आत्तापर्यंत अवघे ९५० गुन्हे उघड करता आले आहेत. त्यातून १ कोटी १४ लाख २२ हजार ४७० रुपयांची वसुली झाली आहे. म्हणजे चोरीला गेलेल्या ऐवजापैकी अवघा १७.३७ टक्के माल चोरट्यांकडून जप्त झाला आहे. अद्याप तब्बल २११२ मंदिरांतील चोऱ्यांचा तपास प्रलंबित आहे. रायगडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवे आगरमधील सुवर्णमूर्तीची ४ वर्षांपूर्वी चोरी झाल्याने पोलिसांवर टीका झाल्यानंतर गृहविभाग जागा झाला होता. मंदिराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमरे बसविणे, स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ‘बीट मार्शल’ला हद्दीतील मंदिराच्या ठिकाणी गस्त घालणे सक्तीचे केले आहे. तरीही मंदिरातील चोरींची संख्या वाढत राहिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
देवस्थाने चोरट्यांच्या ‘टार्गेट’वर
By admin | Published: August 24, 2015 1:06 AM