Join us  

गिरगांव चौपाटी भूमी “ स्वराज्य भूमी ” म्हणून विकसित करा; खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: August 02, 2023 10:09 AM

लोकमान्य टिळकांनी “ स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ” अशा प्रकारची गर्जना करून ब्रिटिश राजवटीला एक मोठा धक्का देण्याचे काम त्यांनी केले होते.

मनोहर कुंभेजकर

मुंबई-लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेश उत्सवास एक नवीन दिशा दिली आहे ज्यामुळे आज इतक्या वर्षांनी देखील धूमधडाक्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यात ही सार्वजनिक गणेश उत्सवास सुरुवात झाली आहे. ही  आपल्या महाराष्ट्रातील जनतेला अभिमानाची बाब आहे. 

लोकमान्य टिळकांनी “ स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ” अशा प्रकारची गर्जना करून ब्रिटिश राजवटीला एक मोठा धक्का देण्याचे काम त्यांनी केले होते. या नेत्याने अनेक वर्षं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, देशासाठी कारावास भोगला, आपल्या विचारांतून, लेखणीतून भारतीय समाजात असंतोषाची ठिणगी पेटवली त्या नेत्याचे गिरगाव चौपाटीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लोकमान्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री- पुरुषांनी १ ऑगस्ट १९२० ला येथे गर्दी केली होती.

लोकमान्य टिळकांचे विचार आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले काम अनंत काळापर्यंत आणि विशेष करून नवीन पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ गिरगांव चौपाटी भूमी “स्वराज्य भूमी” म्हणून विकसित करून देण्याची आवश्यकताअसल्याचे पत्र उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देखिल दिले आहे.

  सदर मागणी आपण दि,४ ऑगस्ट २०१२ साली मुंबईचे तत्कालीन महापौर  सुनील प्रभू यांना पत्राद्वारे केली होती.आणि गिरगांव चौपाटीच्या भूमीस “ स्वराज्य भूमी ” विकसित करण्या संदर्भांत माझे मत कळविले होते असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ल्ली येथे वॉर मेमोरियल विकसित करून देशाच्या सैनिकांचा मान उंचावण्याचे काम केलंय तसेच पोलीस मेमोरियल देखील विकसित करून पोलिसांचा मान देखील उंचावलेला आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील स्वराज्यांसाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ आठवणींची जागा निर्माण करून भावी पिढींच्या मनात स्वातंत्र्य सेनानींची ओळख व आठवण देखील राहील जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र व देशासाठी झटणाऱ्या लोकांची एक मोठी फळीही  निर्माण होऊ शकते असे मत त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांना तसे आदेश निर्गमित करावे जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला गिरगांव चौपाटी याचे रूपांतर “स्वराज्य भूमीत” करून एक खूप मोठे काम या मुंबई शहरासाठी करता येईल असा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबई